मध्य प्रदेशातील देवास येथे दोन समुदायांमध्ये उसळलेल्या संघर्षांत एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने शहरातील दोन भागांमध्ये संचारबंदी जारी केली असून, या घटनेच्या संदर्भात सुमारे ५० लोकांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोतवाली भागातील बाजारात शुक्रवारी रात्री एका इसमावर दुसऱ्या समुदायाच्या तीन जणांनी शस्त्रांनी हल्ला केल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. या घटनेनंतर लोक पळून लागल्याने बाजारात चेंगराचेंगरी होऊन अफवांना ऊत झाला. यानंतर समोरासमोर आलेल्या दोन समुदायांच्या लोकांमध्ये संघर्ष उफाळून त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. यात जबर जखमी झालेला नरेंद्र राजोरिया याला इंदोरला उपचारासाठी हलवण्यात आले असता तो मरण पावला.या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाल्यामुळे कारी-बावडी आणि मल्ली मोहल्ला येथे काल रात्रीपासून संचारबंदी जारी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी पन्नास लोकांना अटक केली असून, ठिकठिकाणी घातलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत ८ पेट्रोल बॉम्ब जप्त केले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक शशिकांत शुक्ला यांनी दिली.दंगल उसळलेल्या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेजारच्या उज्जैन जिल्ह्य़ातून बोलावलेले पोलीस आणि जलद कृतिदलाचे जवान रस्त्यांवर गस्त घालत असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही शुक्ला यांनी सांगितले.
रविवारी दुपारी दोन तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.