घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काँग्रेस पक्षच काम करतो, असे ते म्हणाले आहेत.

राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. त्यांनी सांगितले की काँग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे.

ते म्हणाले की, आज एका सिलिंडरची किंमत काँग्रेसच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त काँग्रेसच काम करते. हा आपल्या आर्थिक धोरणाचा गाभा आहे.

स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती शनिवारी सिलिंडरमागे ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या. इंधनांचे आंतरराष्ट्रीय दर वाढल्यामुळे सहा आठवडय़ांत झालेली ही दुसरी वाढ आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे अन्नघटकांपासून ते सर्व वस्तू आणि सेवांसाठी अधिक किंमत मोजावी लागत असताना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या नव्या दरवाढीचे ओझे नागरिकांवर पडणार आहे.

विनाअनुदानित गॅसच्या १४.२ किलोग्रॅम सिलिंडरसाठी आता सध्याच्या ९४९.५० रुपयांऐवजी ९९९.५० रुपये मोजावे लागतील, असे सरकारी इंधन कंपन्यांनी म्हटले आहे.