बाराशे प्रकाशवर्षे दूर असलेल्या सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणारे पृथ्वीसारखे दोन वसाहतयोग्य ग्रह सापडले आहेत, तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. नासाच्या केप्लर मिशन या मोहिमेत गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे अ‍ॅमेस रीसर्च सेंटरचे विल्यम बोरूकी यांनी जे निष्कर्ष काढले त्यात पाच ग्रह सूर्यासारख्या केप्लर ६२ या ताऱ्याभोवती फिरताना सापडले आहेत. त्यातील दोन पृथ्वीसारखे आहेत. या चारही ग्रहांना सुपर अर्थ म्हणजे महापृथ्वी असे संबोधले जाते कारण ते आपल्या पृथ्वीपेक्षा मोठे आहेत पण सौरमालेतील बर्फयुक्त महाकाय ग्रहापेक्षा मात्र लहान आहेत.
या ग्रहांचा शोध व नंतरची निश्चिती यात यात बुद्धिमत्ता व साधने यांचा संगम असून त्यात वैज्ञानिक समुदायच्या तज्ज्ञतेचाही उपयोग झालेला आहे, असे बोरूकी यांनी सांगितले. या पृथ्वीसारख्या नवीन ग्रहांची त्रिज्या ही अनुक्रमे  पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा १.३, १.४, १.६ व १.९ पटींनी जास्त आहे.
केप्लर ६२ हा तारा केप्लर दुर्बिणीने शोधलेल्या १,७०,००० ग्रहांपैकी एक असून त्याचे वस्तुमान आपल्या सूर्यापेक्षा ६९ टक्क्य़ांनी अधिक आहे.
पृथ्वीसारखे दोन महाग्रह हे पृथ्वीच्या त्रिज्येच्या १.४ व १.६ पटींनी अधिक त्रिज्येचे असून ते त्यांच्या मातृताऱ्याभोवती पृथ्वीला जेवढी उष्णता सूर्यापासून मिळते त्याच्या अनुक्रमे ४१ टक्के व १२० टक्के उष्णता मिळेल एवढय़ा अंतरावरून ताऱ्याभोवती फिरत आहेत. या ग्रहांवर तपमान योग्य आहे. तेथे पाणी द्रव अवस्थेत राहते व सैद्धांतिक पातळीवर हे ग्रह जीवसृष्टीस अनुकूल आहेत.
केप्लर ६२ इ व केप्लर ६२ एफ या ग्रहांचे सैद्धांतिक प्रारूप हे असे सुचवते, की हे दोन्ही ग्रह घन असावेत. तेथे खडक व गोठलेल्या रूपात पाणी असावे. केप्लर ६२ इ हा ग्रह मोठा असून तो सूर्यापेक्षा लहान व शीत ताऱ्याच्या भोवती फिरत आहे. त्याचा आकार पृथ्वीपेक्षा साठ टक्के मोठा असून तो मातृताऱ्याभोवती १२२ दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.