Indian Truck Drivers arrest in US: अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागने इंडियाना राज्यात एक ट्रक जप्त केला आहे. ज्यात ३०९ पाऊंड (१४० किलोहून अधिक) कोकेन जप्त करण्यात आले. याचे मूल्य जवळपास ७ दशलक्ष डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. तसेच या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन भारतीय चालकांनाही अटक केली. कोकेनचे हे प्रमाण अमेरिकेतील १ लाख १३ हजार लोकांना मारण्यासाठी पुरेसे होते, अशी माहिती होमलँड सिक्युरिटीने दिली आहे.
२५ वर्षीय गुरप्रीत सिंग आणि ३० वर्षीय जसवीर सिंग या दोन चालकांना अटक करण्यात आली. दोघे २०१७ आणि २०२३ साली अनुक्रमे अमेरिकेत दाखल झाले होते. मागच्या आठवड्यात तपासणी सुरू असताना एका सेमी ट्रकच्या स्लीपर बर्थमध्ये कोकेन आढळून आले होते.
अमली पदार्थांचा साठा कसा पकडला?
स्निफर श्वानच्या युनिटने ट्रकमध्ये कोकेन असल्याचा शोध लावला. फॉक्स५९ ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या स्लीपर बर्थमध्ये ब्लँकेटने झाकलेले असंख्य कार्डबोर्ड बॉक्स सापडले आहेत. यानंतर दोन्ही चालकांना पुटनम काउंटी तुरुंगात नेण्यात आले. इंडियाना राज्य पोलिसांनी सांगितले की, आरोपींवर अमली पदार्थांच्या तस्करीचे गंभीर आरोप आहेत.
दरम्यान, दोन्ही चालकांनी ट्रकमध्ये असलेल्या सामानाची आपल्याला माहिती नसल्याचे म्हटले आहे. ट्रकच्या कंपनीने त्यांना ट्रक रिचमंडमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाण्याची सूचना दिली होती.
गुरप्रीत सिंग ११ मार्च २०२३ रोजी ऑरिझोनामधून बेकायदेशीरपे अमेरिकेत दाखल झाला होता. तर जसवीर सिंग २१ मार्च २०१७ रोजी कॅलिफोर्नियाहून बेकायदेशीरपणे अमेरिकेत दाखल झाला होता. कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो येथे चोरीची मालमत्ता मिळवल्याबद्दल जसवीर सिंगला अटक झाली होती.
११ मार्च २०२३ रोजी अॅरिझोनातील लुकव्हिलजवळून गुरप्रीत सिंग बेकायदेशीरपणे अमेरिकेत दाखल झाला होता. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष असतानाच्या काळात त्याला अमेरिकेत प्रवेश मिळाला. होमलँडने दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीतने तो भारतीय नागरिक असल्याचे मान्य करत बेकायदेशीर प्रवेश केल्याचे कबूल केले. २१ मार्च २०१७ रोजी कॅलिफोर्नियातील ओटे मेसा जवळून जसवीर सिंग अमेरिकेत दाखल झाला. त्याला सेक्रेटरी ट्रिसिया मॅकलॉघलिन यांनी अटक केली.

१ लाख १३ हजार लोक मरण्याचा दावा किती खरा?
होमलँड सिक्युरीटीने दिलेल्या माहितीनुसार, कोकेनचा १.२ ग्रॅम पेक्षा कमी असलेला डोस प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे जप्त केलेला साठा १ लाख १३ हजार जणांचे प्राण घेऊ शकत होता. भारतीय चालकांना कॅलिफोर्निया राज्याने चालक परवाना दिला होता. होमलँडच्या सहाय्यक सचिव ट्रिसिया मॅकलॉघलिन यांनी कॅलिफोर्नियाच्या धोरणांना बेजबाबदार ठरवत टीका केली आहे.
