scorecardresearch

अबुधाबीमध्ये विमातळावर ड्रोन हल्ला; दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू

तेल टँकरवर ड्रोनचा स्फोट इतका जोरदार होता की अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी आग लागली

Two Indians among 3 dead in drone attack in Abu Dhabi
अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी आग लागली. (Wikimedia Commons)

येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. अबुधाबी पोलिसांनी माहिती दिली आहे की बंडखोरांनी मुसाफा भागात ड्रोन हल्ला केला. परिसरातील तीन ऑईल टँकरवर ड्रोन टाकण्यात आले. यानंतर तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटाची आग अबुधाबी विमानतळापर्यंत पोहोचली. या हल्ल्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.

ही घटना सोमवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने अबू धाबी पोलिसांनी सांगितले की, तेल टँकरवर ड्रोनचा स्फोट इतका जोरदार होता की अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी आग लागली. मात्र, विमानतळावर कोणतीही हानी झालेली नाही. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

दुबईच्या अल-अरेबिया इंग्लिशच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यामध्ये एक पाकिस्तानी आणि दोन भारतीय नागरिकांचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले. स्फोटापूर्वी आकाशात ड्रोन दिसल्याचेही वृत्त असल्याचे अबू धाबी पोलिसांनी सांगितले. अबुधाबीमध्ये दोन ठिकाणी आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पहिली हल्ला मुसाफा येथे तेल टँकरवर झाला, तर दुसरा अबू धाबी विमानतळाच्या बांधकामाच्या ठिकाणी झाला.

हुथीचे प्रवक्ते याह्या सारी यांच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन असा दावा केला होता की, येत्या काही तासांत हुथी युएईवर लष्करी कारवाई करणार आहे. संयुक्त अरब अमिराती दीर्घकाळापासून येमेनमधील गृहयुद्धाचा भाग आहे.२०१५ मध्ये, युएईने अरब युतीचा एक भाग म्हणून येमेनमध्ये सरकार बदलण्यासाठी हुथी बंडखोरांविरुद्ध मोहीम सुरू केली होती.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हुथी बंडखोरांनी दक्षिण सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोनने हल्ला केला होता. त्यामुळे एका नागरी विमानाला आग लागली होती. याशिवाय, ऑगस्ट २०२१ मध्ये, हुथी बंडखोरांनी आणखी एका सौदी विमानतळाला लक्ष्य केले. हुथी बंडखोरांनी यापूर्वी सौदी विमानतळांना लक्ष्य केले आहे. पण युएईवर मधील विमानतळावर मोठ्या हुथी हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे.

दरम्यान, यूएई २०१५ च्या सुरुवातीपासून येमेनमध्ये लढत आहे. येमेनमधील आंतरराष्ट्रीय-समर्थित सरकारला सत्तेतून काढून टाकल्यानंतर इराण-समर्थित हुथींविरूद्ध हल्ला करणाऱ्या सौदीच्या नेतृत्वाखालील युतीचा यूएई एक प्रमुख सदस्य होता. यूएईने येमेनमधील आपले सैन्य कमी केले आहे, पण संघर्षात सक्रियपणे सामील आहे आणि हुथियांशी लढणाऱ्या मोठ्या मिलिशियाचे समर्थन करते. येमेनमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये ते अमेरिकेला सहकार्य करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two indians among 3 dead in drone attack in abu dhabi abn

ताज्या बातम्या