पोप फ्रान्सिस यांनी केरळमधील कुरियाकोस इलियास छावरा व सिस्टर युफ्रेशिया एलुवेनशिकल यांना संतपद जाहीर केले आहे. कॅथॉलिक परंपरेनुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांन संतपद देण्यात आले आहे. सायरो मलबार कॅथॉलिक चर्चमध्ये आता संतपद मिळालेले तीन जण झाले आहेत. २००८ मध्ये सिस्टर अल्फोन्सा यांना संतपद मिळाले होते. सेंट पीटर्स स्क्वेअर येथे व्हॅटिकन येथे झालेल्या खास प्रार्थना सभेत त्यांना संतपद देण्यात आल्याचे सायरो मलबार चर्चने म्हटले आहे. मलबार चर्चचे विद्वान सांगतात की, सेंट थॉमस यांनी केरळच्या किनाऱ्याला पहिल्या शतकात भेट दिली होती त्यानंतर येथील २२ चर्च रोमशी जोडली गेली होती. पोपनी छावरा व युफ्रेशिया यांना संतपद जाहीर केले तेव्हा केरळमधील चर्चेसमध्ये आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. मोठय़ा प्रमाणात कार्डिनल्स, बिशप्स व नन्स व्हॅटिकनला गेले होते. छावरा व युफ्रेशिया यांच्या जीवनाशी संबंधित मन्नमान (कोट्टायम), कुनामावू (अर्नाकुलन), व ओलूर (त्रिचूर ) या तीन ठिकाणी उत्सवाचे वातावरण होते. यातील कुरियाकोस हे समाजसुधारक असून कार्मालाईटस ऑफ मेरी इमॅक्युलेटचे संस्थापक आहेत. त्यांचा जन्म कैनाकारी या अल्लापुझा जिल्ह्य़ातील कुट्टनाड खेडय़ातील झाला होता. १८०५ मध्ये त्यांचा जन्म झाला तर १८७१ मध्ये त्यांचा मृत्यू झाला  होता . सिस्टर युफ्रेशिया या आध्यात्मिक असून त्रिचूर येथे त्यांनी स्थानिक समुदायाचे धार्मिक नेतृत्व केले आहे. त्यांचा जन्म त्रिचूर येथे १८७७ मध्ये झाला व १९५२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.