इतरांना सुरक्षा छावण्यांमध्ये दाखल करण्याचे आदेश

श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच असून, परिस्थिती चिघळली आहे. रविवारी आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातून सर्व परप्रांतीय मजुरांना सुरक्षा दलांच्या छावण्यांमध्ये दाखल करण्यात येत आहे.

दक्षिण काश्मिरातील कुलगाम जिल्ह्य़ात  रविवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आणखी दोन परप्रांतीय मजूर ठार झाले, तर एकजण जखमी झाला. दोघेही मजूर मूळचे बिहारचे होते. २४ तासांहून कमी कालावधीत परप्रांतीय कामगारांवरील हा तिसरा हल्ला आहे. गेल्या काही दिवसांत नागरिकांना लक्ष्य करून गोळ्या घालण्याच्या घटना वाढल्या आहेत. बिहारमधील एक फेरीवाला आणि उत्तर प्रदेशातील एक सुतार अशा दोघांना दहशतवाद्यांनी शनिवारी सायंकाळी गोळ्या घालून ठार केले होते.

रविवारी कुलगामच्या वानपोह भागात दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजुरांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत २ परप्रांतीय ठार, तर एक जखमी झाला, असे काश्मीर पोलिसांनी ट्विटरद्वारे सांगितले. पोलीस व सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘‘तुमच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या सर्व परप्रांतीय मजुरांना सर्वात जवळच्या पोलीस, केंद्रीय निमलष्करी दल किंवा लष्करी आस्थापनात ताबडतोब घेऊन यावे,’’ असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी खोऱ्यातील सर्व जिल्हा पोलिसांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे. ‘‘ही अतिशय तातडीची बाब आहे,’’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

काश्मीरमधील बहुतांश राजकीय पक्षांनी या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आहे. यात प्रामुख्याने पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती, भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर आदींचा समावेश आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल, असे जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले.

पंधरा दिवसांत ११ बळी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत दहशतवाद्यांनी ११ नागरिकांची हत्या केली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण असून, काश्मीर पुन्हा अस्थर्याच्या गर्तेत गेले आहे.