जम्मू :जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) दोन कुविख्यात दहशतवाद्यांना ग्रामस्थांनी पकडून दिले.  नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी ग्रामस्थांच्या धाडसाचे कौतुक करून रोख बक्षीस जाहीर केले.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की ही घटना तुकसान ढोक गावात घडली. अटक दहशतवाद्यांपैकी ‘लष्कर’चा कमांडर तालिब हुसैन राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहे, तो पूर्वी जिल्ह्यातील स्फोटांचा सूत्रधार होता. दुसरा दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथील फैजल अहमद दार आहे. जम्मू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी निवेदनात म्हटले आहे, की, आज तुकसान ढोकच्या ग्रामस्थांनी ‘लष्कर’च्या दोन ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अफाट धैर्य व शौर्य दाखवले. हे दहशतवादी आश्रय घेण्यासाठी या परिसरात पोहोचले होते. या दहशतवाद्यांकडून दोन ए.के. रायफल, सात बाँब, एक पिस्तूल आणि मोठा दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नायब राज्यपालांनी ग्रामस्थांच्या धैर्याचे कौतुक करून,  पाच लाखांचे, तर पोलिस महासंचालकांनी दोन लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले.

दहशतवादाचा अंत आता दूर नाही!

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल  मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे की, मी तुकसान ढोक, रियासी येथील ग्रामस्थांच्या शौर्याला सलाम करतो, ज्यांनी दोन मोस्ट वॉन्टेडह्ण दहशतवाद्यांना पकडले. सर्वसामान्यांचा असा निर्धार हे दर्शवतो, की दहशतवादाचा अंत आता फार दूर नाही.