बंगळूरु : दक्षिण कन्नडमधील भाजपच्या युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. दोन संशयित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचे सदस्य आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

जिल्हा भाजप युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांची बेल्लारी येथील त्यांच्या दुकानासमोर मंगळवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. ते दुकान बंद करून घरी जात असताना त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर बुधवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यात अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटना घडल्या.

या प्रकरणी बेल्लारी पोलिसांनी पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली होती. पीएफआय या संस्थेचे झाकीर (२९) आणि मोहम्मद शाफिक (२७) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही बेल्लारीचे असून त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे काय याचा तपास पोलीस करत आहेत. या दोघांची कसून चौकशी करण्यासाठी त्यांना न्यायालयात दाखल करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहोत,  असे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांकडून सर्व कार्यक्रम रद्द

कर्नाटकमध्ये बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री होऊन बुधवारी एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र हत्येच्या घटनेनंतर बोम्मई यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले. बोम्मई यांनी बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणारी दोड्डबल्लापूर येथील ‘जनोत्सव’ ही मेगा रॅली रद्द केली, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कृत्य करणाऱ्या शक्तींचा नायनाट करण्यासाठी राज्यात विशेष प्रशिक्षित कमांडो फोर्स उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.