दक्षिण दिल्लीत २८ वर्षांच्या एका विवाहितेचा लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या माहेरच्यांनी आमच्या मुलीची हत्या झाली आहे असा आरोप केला आहे. हुंड्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबाने केला आहे. आकृती सुतार असं या मुलीचं नाव आहे. तिचं लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं होतं. आमची मुलगी आत्महत्या करुच शकत नाही तिची हुंड्यासाठी हत्या करण्यात आली आहे असा आरोप आकृतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.
नेमकी घटना काय घडली?
भोपाळमधल्या त्विशा शर्माच्या मृत्यूची बातमी ताजी असतानाच आता दिल्लीतून आणखी एक बातमी समोर आली आहे. आकृती सुतार या विवाहितेचा लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत मृत्यू झाला. ज्यानंतर आकृतीच्या कुटुंबीयांनी हा हुंडाबळी असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी आम्ही सर्व पैलू तपासून बघत आहोत असं म्हटलं आहे. आकृती तिच्या पतीसह दक्षिण दिल्लीतल्या पुष्प विहार या ठिकाणी वास्तव्यास होती. मात्र ती दक्षिण दिल्लीतल्या लोधी कॉलनीच्या तिसऱ्या मजल्यावरुन कोसळली आणि गंभीर जखमी झाली. आकृती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं तेथील रहिवाशांनी पाहिलं आणि पोलिसांना फोन केला. त्यानंतर आकृतीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिथे तिला मृत घोषित केलं. ज्या इमारतीतून आकृती खाली पडली तिथून तिचं सासरचं घर हे १० किमी अंतरावर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?
अनंत मित्तल हे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की आकृती सुतार ही महिला इमारतीवरुन खाली पडली होती. तिच्याबाबत कळताच तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण एम्स रुग्णालयात तिला दाखल करण्यात आल्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणात आम्ही भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये आम्ही सदर घटनेचा तपास करत आहोत. सदर महिलेचा शवविच्छेदन अहवाल येणं अद्याप बाकी आहे. आकृती सुतार ही एका खासगी कंपनीत सेल्स एक्सिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. अरस्तू सिक्का आणि आकृती यांचा विवाह याच वर्षी २४ एप्रिलला झाला होता. आकृती आणि अरस्तू सिक्काची बहीण अगस्तिका सिक्का यांची ओळख आधी झाली. त्यानंतर अरस्तू आणि आकृती यांची ओळख झाली होती. पुढे या दोघांचं लग्न झालं. अरस्तू सिक्का हा सध्या कुठलीही नोकरी करत नाही. त्याचे वडील हे सरकारी नोकरी करतात मात्र त्यांच्याविषयीचे तपशील अद्याप मिळालेले नाहीत असंही पोलिसांनी सांगितलं.
आकृतीच्या कुटुंबाचा आरोप काय?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार आकृतीच्या आई वडिलांनी आकृतीनी आत्महत्या केली असेल यावर आमचा विश्वासच बसत नाही तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप केला आहे. सिक्का कुटुंबाकडून हुंड्याची मागणी होत होती त्यामुळे ही हत्या करण्यात आली. अरस्तू सिक्का आणि त्याच्या कुटुंबाने २० लाख रुपये हुंडा मागितला होता. तसंच आकृतीचा छळ त्यांनी सुरु केला होता असंही आकृतीच्या कुटुंबाने म्हटलं आहे.
