दोन पाकिस्तानी फायटर विमानांनी काल रात्री उशिरा भारतीय हद्दीजवळून उड्डाण केले. जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेजवळ ही पाकिस्तानी विमाने उड्डाण करत होती. भारतीय हवाई दलाचे या विमानांच्या उड्डाणावर अत्यंत बारीक लक्ष होते. भारतीय हवाई दल प्रचंड सर्तक असून या भागातील पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे बारीक लक्ष आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

प्रचंड वेगात ही विमाने उड्डाण करत होती. या विमानांच्या आवाजामुळे काही काळ या भागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भारताने बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. सर्तक असलेल्या भारतीय हवाई दलाने त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरवत त्यांना पिटाळून लावले.

त्यावेळी आकाशात झालेल्या डॉगफाईटमध्ये पाकिस्तानने आपले एक मिग-२१ बायसन विमान पाडले तर आपण त्यांचे अत्याधुनिक एफ-१६ फायटर विमान पाडले. भारताने आतापर्यंत अनेकदा पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याचा दावा केला आहे. पण पाकिस्तानने त्यांचे एफ-१६ विमान पडल्याचे मान्य केलेले नाही. मंगळवारी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानचे जे एफ-१६ फायटर विमान पाडले. त्या विमानाचा वैमानिक कोण होता, त्याची ओळख काय आहे त्याबद्दल भारतीय लष्कराकडे माहिती आहे असे सांगितले.