दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) २०१७ मध्ये दाखल केलेल्या खटल्यात दिल्लीतील न्यायालयाने वृत्तछायाचित्रकार कमरान युसूफ, विक्रेता जावेद अहमद भट आणि फुटीरवादी नेता असायी अंद्राबी यांना पुरेशा पुराव्याअभावी मुक्त केले आहे.
या प्रकरणात एनआयएने एकूण १७ जणांवर आरोप ठेवले होते. यात लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज मोहम्मद सईद, हिज्बुल मजाहिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दिन, जेकएलएफचा एकेकाळचा म्होरक्या यासीन मलिक, शबीर शाह, एसएएस गिलानी यांचा जावई अल्ताफ अहमद शाह आदींचा समावेश होता. आता या प्रकरणात उर्वरित १४ आरोपींवर आरोप निश्चित करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. हे गुन्हे भादंवि आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखालील नोंदवावेत, असे न्यायालयाने सांगितले आहे. युसूफ आणि भट हे दोघेही दगडफेकीच्या अनेक घटनांत सामील असून त्यांचा काही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. पण विशेष न्यायाधीश (एनआयए ) प्रवीण सिंह यांनी १६ मार्चच्या आदेशात म्हटले आहे की, हे दोन आरोपी एका व्यापक कटाशी संबंधित असावेत असा संशय निर्माण होण्याइतपत पुरावा नाही.
या दोघांनाही २०१८ मध्ये जामीन मंजूर झाल्यापासून ते तुरुंगाबाहेर आहेत. या खटल्यातील सर्व १७ आरोपींवर ते काश्मीरमध्ये लोकांना भडकावून फुटीरवादी चळवळ चालवित असल्याचा आरोप आहे.