पेशावर  : पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी रविवारी दोन शीख उद्योजकांची गोळय़ा घालून हत्या केली. अफगाणिस्तानला लागून असलेल्या या अशांत प्रांतात अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य करून झालेल्या हत्यांची ही सगळय़ात अलीकडची घटना आहे. सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सलजीत सिंग (४२) व रणजीत सिंग (३८) हे दोघे जागीच मरण पावले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हल्ल्यानंतर दोघेही हल्लेखोर पळून गेले. मसाल्यांचा व्यापार करत असलेल्या या दोघांची पेशावरपासून सुमारे १७ किलोमीटरवर असलेल्या सरबंद येथील बाटा ताल बाजारात दुकाने होती.  अद्याप कोणत्याही गटाने या हत्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.