चेन्नई : वेगळय़ा धर्माच्या दोन भावांसोबतच्या नातेसंबंधाला पालकांनी विरोध केल्याने तमिळनाडूतील त्रिची येथील दोन बहिणींनी आत्महत्या केली. त्रिची जिल्ह्यातील वलनाडू गावात विद्या (२१) आणि गायत्री (२३) यांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले.
दोन्ही बहिणी कोइम्बतूरजवळील एका खासगी कापड गिरणीत काम करत होत्या. तिथे त्यांची ओळख दोन भावांबरोबर झाली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार त्यांच्या प्रेमसंबंधांत वेगळय़ा धर्मामुळे अनेक अडचणी होत्या. ‘‘दोन्ही बहिणी रविवारी त्यांच्या मूळ गावी मंदिराच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्या खूप वेळ मोबाइलवर बोलत असल्याने पालकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी याबाबत चौकशी केल्यावर, मुलींनी नातेसंबंधांची कबुली दिली. मात्र वेगळय़ा धर्माचे असल्याने पालकांनी तीव्र विरोध केला,’’ असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. बहिणींनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत आईला एक ‘व्हॉइस मेसेज’ पाठवला होता.



