Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पाळीव कुत्र्याचा आजार बरा होत नसल्याच्या नैराश्यामधून दोन सख्या बहिणींनी स्वतःला संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर लखनऊमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही बहि‍णींनी नैराश्यामधून विष प्राशन करून स्वत:चं जीवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, कुटुंबातील इतर कोणीही सदस्य घरी नसताना या दोन्ही बहिणींनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोन्ही बहिणी काही महिन्यांपासून नैराश्याने ग्रस्त होत्या. यामागचं कारण कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचा पाळीव कुत्रा काही काळापासून आजारी होता. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते, पण कुत्रा आजारी असल्यामुळे या दोन्ही बहिणी खूप अस्वस्थ होत्या.

अनेक दिवसानंतरही कुत्र्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि त्यानंतर या बहिणी नैराश्यात गेल्या. त्यांना काही दिवसांपासून खूप अस्वस्थ वाटत होतं. राधा आणि जिया असं दोन्ही बहि‍णींचं नाव असून त्या दोघीही पदवीधर होत्या. तसेच त्या दोघींवरही २०१४ पासून मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपचार सुरु होते.

बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या दोन्ही बहि‍णींच्या आईने त्यांना किराणा खरेदी करण्यासाठी पाठवलं होतं. पण त्या परत आल्यावर त्यांनी विष प्राशन केल्याचं आढळून आलं. त्यानंतर आईने तातडीने आपल्या मुलाला कळवलं. त्यानंतर दोन्ही बहिणींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. तसेच या दोन्ही बहि‍णींच्या मृत्यूमागे आणखी दुसरं कोणतं कारण आहे का? याचाही तपास पोलीस करत आहेत. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.