गाडीचा हॉर्न का वाजतेय असं विचारल्याने दोन तरुणींनी एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री पूर्व दिल्लीतील वसुंधरा एनक्लेवमध्ये ही घटना घडली. या दोन्ही तरुणी बहिणी असून भाव्या जैन आणि चार्बी जैन अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आता दोघींनाही अटक केली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, भाव्या जैन आणि चार्बी जैन या दोघींनी शनिवारी रात्री उशीरा त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या अशोक शर्मा यांच्या फ्लॅटसमोर गाडी उभी करून जोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. त्यावेळी अशोक शर्मा यांनी बाहेर येऊन त्यांना हॉर्न का वाजवतेय? अशी विचारणा केली. यावरून दोघींना त्यांच्याशी वाद घातला. तसेच तिथून निघून गेल्या. त्यानंतर काही वेळाने त्यांनी अशोक शर्मा यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – धक्कादायक! फटाक्यामुळे धावत्या रिक्षाला लागली भररस्त्यात आग, संभाजीनगरचा VIDEO होतोय व्हायरल
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अशोक शर्मा यांनी थेट पोलिसांना फोन केला. त्यामुळे दोघींनी तिथून पळ काढत स्वत:ला फ्लॅटमध्ये बंद केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. मात्र, पोलीस तिथून गेल्यानंतर दोघींनी बाहेर येत पुन्हा अशोक शर्मा यांच्या घराच्या बाहेर येऊन गाडीचा हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. तसेच याठिकाणी पार्क असलेल्या गाड्यांना धडक दिली.
अखेर अशोक शर्मा यांनी पुन्हा पोलिसांना फोन करत याची माहिती दिली. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत दोघींनाही अटक केली. दरम्यान, दोघींनी अशाप्रकारे कुणाला मारहाण करण्याची पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोसायटीच्या चौकीदाराला घरातला नळ तपाण्यासाठी बोलावून त्याला मारहाण केली होती. त्यावेळी चौकीदाराने त्यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.