Noida Police: अनेकवेळा असं होतं की, शाळेत मार्क कमी पडले म्हणून आई-वडील रागवतील का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. मार्क कमी पडले तर आई-वडील रागवण्याची भिती मुलांना असते. या दडपणाखाली अनेकदा मुलं वेगळं पाऊल उचलतात. आता असाच प्रकार उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये घडला आहे. नोएडातील एका खासगी शाळेतील दोन मुलांना कमी मार्क पडले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी जे काही केलं, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
शाळेत कमी मार्क पडल्यामुळे आपले आई-वडील रागावतील म्हणून दोन विद्यार्थी पळून गेले. मात्र, आपली मुलं घरी न आल्यामुळे मुलांचे पालक चांगलेच घाबरले. यानंतर पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शाळेच्या परिसरातील जवळपास ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसेच विद्यार्थ्यांच्या तपासासाठी साध्या वेशातील पोलिसांची ७ पथके तयार केली. यानंतर शाळेपासून तब्बल ४० किलोमिटर लांब हे दोन मुलं मिळून आले. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
नोएडामधील एका खासगी शाळेतील दोन मुलांना कमी मार्क पडले होते. त्यामुळे शाळेच्या शिक्षकांनी त्या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांना शाळेत चर्चा करण्यासाठी बोलावले होते. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळा सुटल्यानंतर थेट आपल्या घरी न जाता पळून जाण्याचं ठरवलं. कमी मार्क मिळाल्यामुळे आई-वडील रागावतील अशी भिती त्यांना होती. त्यामुळे दोन्ही मुलं पळून गेली. यानंतर त्यांची पालकांनी सगळीकडे शोधाशोध सुरु केली. मात्र, मुले काही मिळून आली नाहीत.
त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर नोएडा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत विद्यार्थ्यांचा शोध सुरु केला. विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल ७ वेगवेगळे पथके तयार केले. तसेच मुलं ज्या परिसरातून पळून गेले होते, त्या परिसरातील ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. पण तरीही मुलं काही मिळून आले नाहीत. त्यानंतर काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये विद्यार्थी दिसून आले. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली. त्यानंतर शाळेपासून जवळपास ४० किलोमीटर अंतरावर दिल्लीतील एका विहारमध्ये हो दोन्ही विद्यार्थी मिळून आले. यानंतर पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांकडे दिले. दरम्यान, यानंतर पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.