मणिपूर शहरातील दोन तमिळ तरुणांचे मृतदेह मंगळवारी शेजारच्या म्यानमारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचीही गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. मोरेह शहरातील रहिवासी, पी मोह (२७) आणि एम अय्यरनार (२८) मंगळवारी सकाळी म्यानमारच्या तामूमध्ये गेले होते. मोरेह तमिळ संगमच्या सचिवानुसार दोघेही एका तामिळ मित्राला भेटायला गेले होते. मोरेह हे मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवर वसलेले सीमावर्ती शहर आहे.

फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोंवरून, दोघांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडल्या गेल्याचे दिसते. एकाच्या कपाळाला गोळी लागली होती तर दुसऱ्याच्या डोक्याच्या बाजूला गोळी लागली होती. तमू शहरातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले होते. मंगळवारी दुपारी मोरेह येथील व्यापाऱ्यांनी त्यांची ओळख पटवली.

मंगळवारी आणि बुधवारी मणिपूरची राजधानी इंफाळपासून ११० किमी अंतरावर असलेल्या मोरेहमध्ये दोघांच्या मृत्यूच्या बातमीनंतर उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. मोरेह शहरात मेइटीस, कुकी, तमिळ, पंजाबी आणि इतर लोक राहतात. येथे तमिळ लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

भारतीय अधिकारी मृतदेह परत आणण्यासाठी मोरेहमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. “आतापर्यंत, आमच्याकडे या दोघांची हत्या का आणि कोणी केली याचा कोणताही तपशील नाही. परंतु मृतदेह परत आणण्यासाठी उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे”, मोरेह पोलिसांचे प्रभारी अधिकारी आनंद यांनी सांगितले.

तमिळ संगमचे सचिव के बी एम मनियम यांनी आरोप केला आहे की या दोघांना म्यानमार लष्कराने तयार केलेल्या मिलिशिया प्यू शॉ हेटीने गोळ्या घातल्या आहेत. “सकाळी तमूसाठी निघालेले दोघेजण दोन तासांनंतर मोबाईल नेटवर्कच्या बाहेर गेले होते. ते दोघेही मोरेह येथील रिक्षाचालक असून दुचाकीवरून तिथे गेले होते. आम्हाला सीमेपलीकडील लोकांकडून कळले आहे की दोन व्यक्तींना प्यू शॉ हेटीने थांबवले आणि गोळ्या घातल्या,” असे मनियम यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

भारत-म्यानमार सीमेवर राहणाऱ्या लोकांना व्हिसा निर्बंधांशिवाय सीमेच्या दोन्ही बाजूपर्यंत १६ किमी पर्यंत प्रवास करता येतो. पण २०२० मध्ये कोविडचा उद्रेक झाल्यापासून आणि म्यानमारमधील लष्करी बंडानंतर, मोरेह-तामू सीमेवर लोकांचा प्रवास पूर्वीसारखा राहिलेला नाही.