श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी लष्कराच्या अग्निवीर भरती प्रक्रिया स्थळावर हल्ल्याचा कट रचणारे ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेचे दोन स्थानिक दहशतवादी चकमकीत ठार झाले. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले, की हे दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ संघटनेचे सदस्य होते.

बारामुल्लाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रईस भट यांनी पत्रकारांना सांगितले, की गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी पहाटेच पट्टणमधील येदीपोरा भागात नाकाबंदी आणि तपास मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दल पथकांवर गोळीबार केला. त्यानंतर  सकाळी दीर्घकाळ चकमक चालली. अखेर त्यात दोन दहशतवादी मृत्युमुखी पडले. पट्टण येथील हैदरबेग भागात सुरू असलेल्या लष्कराच्या अग्निवीर भरतीच्या ठिकाणी हल्ला करण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला होता.