अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये बर्फाने गोठलेल्या सरोवरावर दोन पर्यटकांनी पाय ठेवला. त्यानंतर त्यांच्या वजनाने बर्फाचा वरील नाजूक थर कोसळून दोन्ही पर्यटक बर्फाखालील सरोवरात बुडाले. त्यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. समुद्र सपाटीपासून सुमारे १३ हजार फूट उंच असलेल्या तवांग मधील ‘सेला लेक’ या सरोवरावर ही घटना शुक्रवारी (१६ जानेवारी) घडली. मृत्यू झालेले दोन्ही पर्यटक केरळचे आहेत.
तवांगमधील सेला सरोवर (सेला लेक) हे सध्या बर्फाने गोठले आहे. सरोवर पाहण्यासाठी तवांगमध्ये पर्यटकांची गर्दी आहे. सेला सरोवर समुद्र सपाटीपासून सुमारे १३ हजार फूट उंचीवर आहे. केरळमधील दोन पर्यटकांचे मृतदेह सेला सरोवरातून शनिवारी सकाळी बाहेर काढण्यात आले. दोन्ही पर्यटकांनी बर्फाने गोठलेल्या सरोवरावर पाय ठेवला होता. त्यांच्या वजनाने बर्फाचा पृष्ठभाग कोसळला व दोघेही बर्फाखालील सरोवरात बुडाले होते.
केरळमधील बिनू प्रकाश (२६) यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शनिवारी सकाळी १० च्या सुमारास माधव एम. (२३) यांचा मृतदेह सरोवरातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मृतदेह सरोवरातून बाहेर काढणे रेस्क्यू टीमला अवघड गेले. मदत कार्य सुरू असताना घटनास्थळी पोलीस, राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे जवान, भारतीय लष्कराच्या २४ जाट रेजिमेंटचे जवान, सशस्त्र सीमा दल व इंडो तिबेट सीमा पोलिस उपस्थित होते. मृत्यू झालेले दोघे केरळमधून आलेल्या सात पर्यटकांपैकी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मित्राला वाचवण्यासाठी ठेवला बर्फाच्या सरोवरावर ठेवला होता पाय
तवांगचे पोलिस अधीक्षक डी. डब्ल्यू. थोंगोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्राथमिक तपासात एका मुलाने सर्वात आधी गोठलेल्या सरोवरावर पाय ठेवल्याचे आढळून आले. तो मुलगा बर्फाच्या खालील तलावात बुडाला. त्याला वाचवण्यासाठी दोघे जात होते. त्यावेळी ते बर्फाच्या सरोवरावरून जात असताना बर्फाचा थर कोसळला व दोघेही खालील तलावात बुडाले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. आधी जो मुलगा बुडाला होता, तो स्वत:च प्रयत्न करून बर्फाच्या तलावातून बाहेर आला होता. त्याच्यावर सध्या बैसाखी मिलिटरी स्टेशन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.” दरम्यान, दोघांचे मृतदेह रविवारी सकाळी गुवाहाटीवरून केरळला पाठवले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Two Kerala tourists drown after Arunachal’s frozen Sela Lake cracks under their weight
— The Indian Express (@IndianExpress) January 17, 2026
Read more here: https://t.co/PxvxxpltG9 pic.twitter.com/RwOGzhzZNQ
प्रशासनाचे आवाहन पर्यटकांनी धुडकावले
तवांग प्रशासनाने ‘सेला लेक’ परिसरात गोठलेल्या सरोवरावर न जाण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले आहेत. तरीही पर्यटक बर्फाने गोठलेल्या सरोवरावर जात असल्याचे निदर्शनास आले. १७ डिसेंबर रोजी तवांग प्रशासनाने एक सूचना जारी केली होती. त्यात सरोवरावरील बर्फ नाजूक असून तो वजनाने कोसळू शकतो, असे म्हटले होते. प्रशासनाच्या सूचनांचे पालन पर्यटक करत नसल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
