scorecardresearch

दिल्लीत दोन बेवारस बॅगा सापडल्या

बॉम्बशोधक व नाशक पथकही त्या ठिकाणी पोहचले.

प्रजासत्ताक दिन समारंभ जवळ आलेला असतानाच पूर्व दिल्लीतील त्रिलोकपुरी भागात बुधवारी दोन बेवारस बॅगा सापडल्या, मात्र लॅपटॉप आणि वैयक्तिक वस्तूंशिवाय या बॅगांमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही.

 त्रिलोकपुरीतील मेट्रो उड्डाणपुलाच्या एका खांबाजवळ या बॅगा पडून असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना, तसेच कल्याणपुरी पोलीस ठाण्यात दुपारी १ वाजता मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ही जागा मोकळी केली. बॉम्बशोधक व नाशक पथकही त्या ठिकाणी पोहचले. मात्र या बॅगांमध्ये काही संशयास्पद आढळले नाही, असे पोलीस उपायुक्त प्रियंका कश्यप यांनी सांगितले.

 बॅगेतील कागदपत्रे सोमेश गुप्ता नावाच्या व्यक्तीची असल्याचे आढळले असून, त्याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असल्याचेही कश्यप म्हणाल्या.

 गेल्या आठवड्यात आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट भरलेले एक स्फोटक उपकरण (आयईडी) गाझीपूर फूल बाजारात एका बेवारस बॅगेत सापडले होते. हे स्फोटक एका लोखंडी पेटीत ठेवण्यात येऊन काळ्या रंगाच्या बॅकपॅकमध्ये दडवण्यात आले होते. हे आयईडी याच भागात एका खोल खड्ड्यात उतरवून नंतर नष्ट करण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांना संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळाल्यामुळे, प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी ‘अत्यंत खबरदारीचा इशारा’ जारी करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two useless bags found delhi republic day ceremony metro flyover akp