मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार व कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने दोन वर्षांपूर्वीच भारतात परतण्याची तयारी दर्शवली होती. तत्कालीन मनमोहन सरकारमध्ये याबाबत चर्चाही झाली. मात्र, दाऊदविरोधात त्याच्या अटी-शर्थीवर खटला चालवणे जोखमीचे ठरेल, हे लक्षात आल्याने तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दाऊदचा हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचा नेता असलेल्या दिल्लीस्थित वकिलाने केला आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाल्याचे स्मरत नाही, असे सांगत कानावर हात ठेवले आहेत तर माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या दाऊदला आयुष्याचा उर्वरित काळ मुंबईतील आपल्या कुटुंबकबिल्यासोबत व्यतीत करायचा आहे. या पाश्र्वभूमीवर त्याने २०१३ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारकडे भारतात येऊन १९९३ बॉम्बस्फोट मालिकेसंदर्भातील खटल्याला सामोरे जायची तयारी दर्शवली होती. दाऊदच्या या प्रस्तावाची चर्चा काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांशी झाली. मात्र, अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला. तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. परंतु दाऊदच्या अटी-शर्थीवर खटला चालवणे जोखमीचे ठरेल, असे लक्षात आल्याने हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला, असे या काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले. यासंदर्भात मनमोहन सिंग यांच्याकडे ई-मेलद्वारा विचारणा केली असता अशी कोणतीही चर्चा झाल्याचे स्मरत नाही, असे उत्तर दिले. तर मेनन प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. या घडामोडींशी संबंधित असलेल्यांनी दाऊदच्या या प्रस्तावाबाबत प्रथमत काँग्रेस नेतृत्वाला कल्पना देण्यात आली व नंतर पंतप्रधान कार्यालयाकडे हा प्रस्ताव निर्णयासाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले. दाऊद टोळीशी संबंधित असलेले अनेक खटले चालवण्याचा अनुभव असलेल्या या काँग्रेस नेत्यामार्फतच दाऊदने हा प्रस्ताव दिला होता.
निर्दोषत्व सिद्ध करण्याची इच्छा?
बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊद १९९३ मध्ये दुबईला पळाला. तेथे त्याच्या वकिलांनी दाऊदचे वकीलपत्र तयार करून मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचे कामकाज दिल्लीत चालवण्याचे विनंतीपत्र सर्वोच्च न्यायालयाकडे देण्यासाठी तयार केले होते. दाऊदला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचे ‘निर्दोषत्व’सिद्ध करायची इच्छा होती, असेही या काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले आहे.