TVK Government vs MK Stalin Hindi Row: तमिळनाडू राज्यातील महामार्गावरील एका दिशादर्शक फलकावर हिंदी भाषेचा वापर केल्याप्रकरणी तमिळनाडू सरकारने दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या घटनेमुळे राज्यातील प्रस्थापित ‘द्विभाषा धोरणा’वरून नवा राजकीय वाद उफाळला असून द्रमुकचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सत्ताधारी ‘तमिळगा वेत्री कळघम’ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

तमिळनाडूतील थूथुकुडी जिल्ह्यातील सातानकुलम येथे राज्य महामार्ग विभागाने हा दिशादर्शक फलक लावला होता. राज्यात सामान्यतः केवळ तमिळ आणि इंग्रजी भाषेतच फलक लावले जातात; मात्र या फलकावर हिंदी अक्षरांचाही वापर करण्यात आल्याचे छायाचित्रांवरून समोर आले. या फलकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाद चिघळताच राज्य सरकारने तातडीने कारवाईचा बडगा उगारला.

“राज्य महामार्गावरील फलकावर हिंदी शब्दांचा वापर केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे,” अशी माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

टीव्हीकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

टीव्हीके सरकारने जाहीरपणे राज्यात तमिळ आणि इंग्रजी हे द्विभाषा धोरणच कायम राहील अशी भूमिका मांडलेली असताना ही घटना घडली आहे. नुकतेच शालेय शिक्षण मंत्री राजमोहन अरुमुगम यांनीही हिंदीच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान सरकार तमिळ आणि इंग्रजी या धोरणाला बांधील असल्याचा पुनरुच्चार केला होता. मात्र, प्रत्यक्षात महामार्गावर हिंदी फलक झळकल्याने सरकारवर विरोधकांकडून दुटप्पीपणाचा आरोप केला जात आहे.

‘हेच का तुमचे परिवर्तन?’; स्टॅलिन यांचा सवाल

द्रमुकचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. “तमिळनाडूने अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडून होणाऱ्या हिंदी लादण्याच्या प्रयत्नांचा ठामपणे विरोध केला आहे. मात्र आता खुद्द राज्य सरकारच महामार्गांवर हिंदी फलक लावण्याची परवानगी कशी देत आहे?”, असा सवाल स्टॅलिन यांनी उपस्थित केला.

“आता खुद्द राज्य सरकारच हिंदी लादण्याचे काम करत आहे. ज्या परिवर्तनाची भाषा हे करत होते, तो हाच बदल आहे का?” असा खोचक टोला स्टॅलिन यांनी लगावला. तसेच विरोधकांनी टीका केल्यानंतर प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचा हा आणखी एक प्रकार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.