एपी, दुबई

अमेरिका-इराण यांच्यात शस्त्रसंधी लागू असला तरी पश्चिम आशियामध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) एकमेव आणि महत्त्वाच्या असलेल्या बराक आण्विक ऊर्जा प्रकल्पाला रविवारी ड्रोन हल्ल्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या एका बाजूला आग लागली. या हल्ल्याची जबाबदारी कुणी घेतली नसली तरी इराणकडे संशयाची सुई वळते आहे. दरम्यान, इराणने अमेरिकेच्या प्रस्तावांबाबत लवकर पावले उचलली नाहीत, तर त्यांना बेचिराख करू, अशी धमकी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

पश्चिम आशियात होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव कायम आहे. इराणच्या बंदरांची कोंडी अमेरिकेने केली आहे, तर सामुद्रधुनीतून जाणार्या नौकांना इराण लक्ष्य करीत आहे. अमेरिका-इराणमध्ये करार होऊन येथील समस्या सोडविण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. इराणच्या या पवित्र्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही संयम संपत चालल्याचे वक्तव्य नुकतेच केले होते. इस्रायल आणि हेजबोला यांच्यातील संघर्षही अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. अशा स्थितीत ‘यूएई’च्या आण्विक प्रकल्पाला लक्ष्य केल्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

बराक अणुऊर्जा प्रकल्प हा २० अब्ज अमेरिकी डॉलरचा असून, दक्षिण कोरियाच्या मदतीने यूएईने तो तयार केला आहे. अरब जगातील हा एकमेव अणुऊर्जा प्रकल्प असून, एकचतुर्थांश यूएईची तो ऊर्जेची गरज पुरी करू शकतो. या ड्रोन हल्ल्यामुळे कुठल्याही प्रकारचे आण्विक उत्सर्जन किंवा कुणी जखमी झाले नाही. आगीमुळे प्रकल्पाचे नुकसान झाले नसल्याची माहिती यूएईच्या अणू नियामक मंडळाने दिली आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. लष्करी कृतीमुळे अणुसुरक्षेला धोका स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘यूएई’ने इस्रायलच्या हवाई संरक्षण दलाच्या सैनिकांना व कर्मचार्यांना आश्रय दिला आहे. त्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितल्याचे नेतान्याहू यांच्या कार्यालयाचे सांगितले.

व्यावसायिक जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या ऊर्जा आणि पुरवठासाखळीसंदर्भातील आर्थिक आणि सामाजिक मंडळाने बोलावलेल्या विशेष बैठकीत भारताने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणार्या व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करण्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘होर्मुझ’मधील सागरी वाहतूक रोखून धरणे स्वीकारार्ह नसल्याची भूमिका भारताचे ‘यूएन’मधील कायमस्वरूपी प्रतिनिधी पी. हरीश यांनी मांडली. १३ मे रोजी भारताचा ध्वज असलेली व्यावसायिक नौका ओमानच्या आखाताजवळ झालेल्या हल्ल्यात बुडाली.

ट्रम्प यांची इराणला धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड

ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली. अमेरिकेच्या प्रस्तावावर इराणच्या नेत्यांनी तातडीने कारवाई केली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इराणसाठी वेळ निघून जात आहे. त्यांनी वेगाने हालचाल करणेच योग्य ठरेल, नाहीतर त्यांचे काहीही शिल्लक राहणार नाही. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे, असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये लिहिले.

एलपीजी’वाहू जहाज गुजरातमध्ये

कतारहून २० हजार टन द्रवीभूत पेट्रोलियम वायू (एलपीजी) घेऊन येणारे जहाज गुजरातच्या दीनदयाळ बंदर प्राधिकरणामध्ये दाखल झाले. ‘एमव्ही सायमी’ नावाचे ही जहाज असून होर्मुझ सामुद्रधुनी पार करून ते कांडला येथील बंदरावर दाखल झाले. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर भारताच्या आतापर्यंत १२ एलपीजी टँकर, १ क्रूड तेलाच्या टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आहे.