Pakistan-UAE : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाला तब्बल एक महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही हे युद्ध थांबलेलं नाही. अमेरिका-इस्त्रायल अजूनही संयुक्तपणे इराणवर भीषण हल्ले करत आहेत, तर दुसरीकडे हे युद्ध थांबण्याच्या चर्चा सुरू आहेत. पण अद्याप तरी युद्ध थांबवण्याबाबत कोणताही स्पष्ट तोडगा निघालेला नाही. या युद्धामुळे तेल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतही तणाव आहे आणि याचाच फटका जगातील अनेक देशांना बसत आहे.

भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या तुटवड्याचं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे इंधन दरवाढीने पाकिस्तान हवालदील झाल्याचं चित्र आहे. पाकिस्तानात सध्या पेट्रोल ४५० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटर आणि डिझेल ५०० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटरवर पोहोचलं आहे. त्यामुळे अमेरिका-इराण युद्धाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसत असल्याचं दिसत आहे.

अमेरिका-इराण युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, या युद्धात मध्यस्थी करायला निघालेल्या पाकिस्तानला आता मोठा धक्का बसला आहे. मध्य-पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने (UAE) पाकिस्तानला ३.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज या महिन्यात परत करण्याची मागणी केली आहे. आधीच महागाईने होरपळलेल्या पाकिस्तानला यामुळे धक्का बसला आहे.

यूएईने (UAE) पाकिस्तानकडे कर्ज त्वरित परत करण्याची मागणी केल्यानंतर पाकिस्तानने एप्रिल अखेरपर्यंत संपूर्ण ३.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज देण्याचं आश्वासन दिलं असल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ पाकिस्तानी कॅबिनेट मंत्र्याने दुजोरा दिला आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. त्यामुळे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाची त्वरित परतफेड करण्याची मागणी केली आहे.

अमेरिका-इराण युद्धामुळे पाकिस्तान हवालदील

अमेरिका-इराण युद्धाचा पाकिस्तानला सर्वात जास्त फटका बसत आहे. यातच पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी गुरुवारी इंधनाच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. पाकिस्तानात आता पेट्रोल ४५० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटर आणि डिझेल ५०० पाकिस्तानी रुपये (PKR) प्रति लिटरवर पोहोचलं आहे.वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने गुरुवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १३७.२४ पाकिस्तानी रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर १८४.४९ पाकिस्तानी रुपये एवढी वाढ केली आहे.दरम्यान, केरोसीनच्या दरातही प्रति लिटर ३४.०८ पाकिस्तानी रुपयांची वाढ करण्यात आली असून आता पाकिस्तानात केरोसीनही ४५७.८० पाकिस्तानी रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.