अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधी झाली होती, त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष थांबण्याची चिन्हे असतानाच काही दिवसांपूर्वी अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्षात पुन्हा वाढ झाली. अमेरिका-इराण युद्धाचा फटका जागतिक व्यापाराला बसत असल्यामुळे जगातील अनेक देशांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत.
अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराच्या अनुषंगाने डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी करारावर स्वाक्षऱ्याही केल्या होत्या. मात्र, त्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढल्यामुळे अमेरिका-इराणमधील ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ मोडल्याची चर्चा आहे. या घडामोडी दरम्यानच आता संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशाने इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप संयुक्त अरब अमिरातीने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर यूएईने आता इराणच्या विरोधात मोठं पाऊल उचललं आहे. इराणबरोबरचे सर्व प्रकारचे व्यापार आणि आर्थिक व्यवहार थांबवल्याची घोषणा यूएईने मंगळवारी केली आहे. त्यामुळे आखाती देशात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भातील माहिती यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर (ट्विटर) एक निवेदन जारी करत दिली आहे.
यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं?
प्रादेशिक तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर इराणबरोबरचे सर्व व्यापार, व्यावसायिक व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
مديرة الاتصال الإستراتيجي في وزارة الخارجية: وقف جميع الأنشطة والتبادلات التجارية والمعاملات المالية مع إيران
— MoFA وزارة الخارجية (@mofauae) August 18, 2026
Director of the Strategic Communications Department at MoFA: All Trade, Commercial Exchange, and Financial Transactions with Iran Halted pic.twitter.com/PQczXyDNRX
इराणकडून समुद्री वाहतुकीला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप यूएईने केला आहे. त्यामुळे प्रादेशिक तणावात होणारी वाढ आणि प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्यांबाबतच्या चिंतेचं कारण देत संयुक्त अरब अमिरातीने बुधवारी इराणबरोबरचे सर्व व्यापार स्थगित केले आहेत. यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्क विभागाच्या संचालिका अफ्रा महश अल हामेली यांनी म्हटलं की, “पुढील सूचना मिळेपर्यंत हा निर्णय लागू असेल.”
“इराणबरोबरचे सर्व व्यापार, व्यावसायिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यवहार पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आले आहेत. शांतता आणि स्थिरता वाढवण्याचे साधन म्हणून संवाद, सहकार्य आणि प्रादेशिक एकात्मता यांसाठी यूएई कटिबद्ध आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्वोच्च जागतिक नियमानुसार आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची अखंडता जपण्यासाठी यूएई कायम कटिबद्ध आहे”, असंही अफ्रा महश अल हामेली यांनी स्पष्ट केलं आहे.
