महिला प्रवाशासोबत केलेल्या असभ्य वर्तनामुळे उबर कॅब सर्व्हिस पुन्हा एकदा चर्चेत आहे. 19 मार्च रोजीचा हा प्रकार आहे. पीडित महिलेने उबरकडे यासंबंधी तक्रार केली आहे. यासोबत आपल्यासोबत झालेला प्रकार ट्विटरवर शेअर केला आहे. महिलेने संबंधित चालकावर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे. दिल्लीच्या रहिवासी असणाऱ्या अमृता दास यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, ‘जेव्हा ही घटना घडली तेव्ही मी माझ्या पतीसोबत प्रवास करत होती. चालक प्रमाणापेक्षा जास्त उद्धटपणे वागत होता. मी त्याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे’.

अमृता दास यांनी सांगितल्यानुसार, ‘मी चालकाला एसी सुरु करण्यास सांगितलं होतं. पण त्याने नकार दिला. मी यावरुन त्याच्याशी वाद घातला असता जास्त गरम होत असेल तर माझ्या मांडीवर येऊन बस असं उद्धट उत्तर त्याने दिलं. यानंतर जेव्हा प्रवास सुरु झाला तेव्हा चालक वारंवार मी कारमधून खाली उतरावं यासाठी प्रयत्न करत होता. हे सर्व झालं तेव्हा माझे पतीदेखील सोबत होते’.

उबरने अमृता दास यांच्या तक्रारीला उत्तर दिलं आहे. उबरने म्हटलं आहे की, ‘घडल्या प्रकाराने आम्ही दुखी आहोत. आमच्या टीमने इमेलच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर त्याप्रमाणे आम्हाला कळवा’. उबरच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की ‘हा जो काही प्रकार झाला आहे त्याला आमच्याकडे काहीही जागा नाही. चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही चालकाला आमच्या अॅप सिस्टीमवरुन हटवलं आहे’.

दरम्यान सोशल मीडियावर याप्रकरणी संमिश्र प्रतीक्रिया पहायला मिळाल्या. काही लोकांनी तात्काळ चालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तर काहीजणांनी महिलेकडे याचा पुरावा देण्याची मागणी केली आहे.