नवी दिल्ली : उदयपूर येथे शिवणकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोघा आरोपींपैकी एक जण भाजपचा सदस्य आहे, असा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने तातडीने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिला का? असा सवालही काँग्रेसचे प्रसारमाध्यम व प्रचारप्रमुख पवन खेरा यांनी उपस्थित केला. अशाच प्रकारचे आरोप काँग्रेस नेत्या रेणुका चौधरींनी केले होते, मात्र, भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही खोटी बातमी असल्याचा खुलासा केला.

खेरा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, हे नवीन तथ्य समोर आल्याने असा प्रश्न पडला आहे, की याच कारणांमुळे ‘एनआयए’कडे तातडीने तपास सोपवला गेला असावा. भाजप आपले नेते-प्रवक्त्यांच्या माध्यमातून अवघ्या देशात जातीयवादाची आग भडकावून ध्रुवीकरण निर्माण करून त्याचा निवडणुकीत लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे का?

खेरा यांनी यावेळी समाजमाध्यमांत प्रसिद्ध झालेली काही छायाचित्रे दाखवत सांगितले, की भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या दोन नेत्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, की उदयपूरच्या हत्याप्रकरणातील एक आरोपी रियाजी अटारी हा भाजपचा कार्यकर्ता आहे. रियाज अटारी भाजपचे नेते गुलाबचंद्र कटारियांच्या कार्यक्रमात नियमित सहभागी असे. उदयपूरचे स्थानिक भाजप नेते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्याचा उल्लेख ‘आमचे कार्यकर्ते रियाज भाई’ असा करतात. फेसबुकवर प्रसिद्ध झालेली छायाचित्रे सार्वजनिक कार्यक्रमांतील असतील, हे आम्ही समजू शकतो. परंतु संबंधित पोस्टमधील मजकुरातून असे स्पष्ट होते, की कन्हैयालाल यांची हत्या करणारा रियाज अटारी भाजपचा सक्रिय सदस्य आहे. काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या स्फोटातील आरडीएक्स कुठून आले याचे उत्तर आजतागायत मिळालेले नाही.

आज संध्याकाळपर्यंत भाजपसारखा तथाकथित राष्ट्रवादी पक्ष उदयपूर हत्याप्रकरणी आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देईल, अशी आम्हाला आशा असल्याचे सांगून खेरा म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फक्त नूपुर शर्मा यांच्यावर ताशेरे मारले नाही तर हे ताशेरे भाजपवरही होते. भाजप आणि त्याचे नेते ध्रुवीकरण, फूट पाडण्यास अनुकूल वातावरणनिर्मिती करतात. यावर पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा अजूनही मौन बाळगणार आहेत का?

यापूर्वी काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी ‘ट्विटर’वर काही बातम्यांची छायाचित्रे दाखवत उदयपूर येथील हत्याप्रकरणातील एक आरोपी भाजपचा सदस्य आहे. त्यावर भाजपच्या अमित मालवीय यांनी खुलास करताना सांगितले होते, की तुम्ही खोटय़ा बातम्या पसरवत आहात, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु उदयपूरच्या हत्येशी संबंधित आरोपी भाजप सदस्य कधीही नव्हता. जसे तामिळ बंडखोर संघटना ‘एलटीटीई’च्या सदस्यांनी राजीव गांधी यांच्या हत्येसाठी काँग्रेसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता, तशीच या आरोपीने भाजपमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असेल. काँग्रेसने दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत देशवासीयांची दिशाभूल करत त्यांना मूर्ख बनवण्याचे काम थांबवले पाहिजे.

दहा दिवसांची एनआयए कोठडी

जयपूर : उदयपूरमधील कन्हैयालाल तेली यांची गळा कापून हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद रियाझ आणि गौस महम्मद यांना जयपूरमधील एनआयए न्यायालयाने दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. या दोघांसह चौघा आरोपींना एनआयएने न्यायालयात हजर केले होते. आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या नागरिकांनी न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. यात वकिलांचाही समावेश होता. आरोपींना पोलिसांच्या वाहनात बसवताना निदर्शकांनी त्यांना घेरले. आरोपींना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न काही निदर्शकांनी केला.  दरम्यान, याप्रकरणी राजस्थान सरकारने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने आपल्याकडील कागदपत्रे-पुरावे आता एनआयए अधिकाऱ्यांकडे सोपविले आहेत.

राजस्थान सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजपवर आरोप!

* दरम्यान, राजस्थानच्या भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सादिक खान यांनी उदयपूरच्या हत्या प्रकरणातील आरोपी भाजपचा सदस्य नसल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी  सांगितले, की रियाज यांची काही स्थानिक भाजप नेत्यांसह छायाचित्रे म्हणजे हा आरोपी भाजपचा सदस्य असल्याचा पुरावा होऊ शकत नाही.

* कुणीही व्यक्ती कोणत्याही नेत्यासह छायाचित्र काढू शकतो. तेवढय़ावरून तो भाजपचा सदस्य आहे, असा याचा अर्थ अजिबात होत नाही. पक्षाच्या कुठल्या तरी कार्यक्रमात हा आरोपी गेला असेल व त्याने स्थानिक नेत्यांसह छायाचित्रे काढली असतील. तसेच ही छायाचित्रे त्याने फेसबुकवर प्रसिद्ध केली असतील. खरे तर कन्हैयालाल यांना धमकी मिळाल्यानंतरही त्यांना सुरक्षा दिली गेली नाही, हे राजस्थान सरकारचे अपयश आहे. गेल्या तीन वर्षांत अल्पसंख्याकांना गहलोत सरकारकडून काहीही मिळाले नाही.

* हे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी काँग्रेस भाजपवर हे बिनबुडाचे आरोप करत आहे. या हत्येतील आरोपी अख्तरीच्या मोटारसायकलचा क्रमांक २६११ होता. कट्टरपंथीय विचारांचा निदर्शक असा हा आपल्या पसंतीचा क्रमांक त्याने २०१३ मध्ये मिळवला होता.