पीटीआय, उदयपूर/ जयपूर/ नवी दिल्ली : केंद्र सरकारने बुधवारी उदयपूरमधील शिवणकाम व्यावसायिकाच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला. हे एक  दहशतवादी कृत्य असल्याने त्यात कोणती संघटना अथवा आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग आहे का, याचा तपास आवश्यक असल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, उदयपूरमधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली असून, राजस्थानच्या सर्व ३३ जिल्ह्यांत मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले, की त्यांच्या सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. अशा घटना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कट्टरपंथी घटकांच्या सहभागाशिवाय घडूच शकत नाहीत. विशेष तपास पथक (एसआयटी) उदयपूरला पाठवले आहे. त्यावेळी उदयपूर शहरात तणावाचे वातावरण होते.

कन्हैयालाल तेली या शिवणकाम व्यावसायिकाची मंगळवारी उदयपूरमध्ये दोन जणांनी धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली आणि धार्मिक भावनांच्या अपमानाचा बदला घेत असल्याचे सांगत त्याची चित्रफीत सार्वजनिक केली. बुधवारी शवविच्छेदनानंतर कन्हैयालाल यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. उदयपूरच्या सेक्टर-१४ येथील त्यांच्या घरापासून कडेकोट बंदोबस्तात कन्हैयालाल यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. ज्यात शेकडो लोक उपस्थित होते. राजस्थानचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया हेही यावेळी उपस्थित होते.

पाहा व्हिडीओ –

गेहलोत यांनी गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव, मुख्य सचिव उषा शर्मा, अतिरिक्त मुख्य सचिव गृह, पोलीस महासंचालक (डीजीपी), गुप्तचर विभागाचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची जयपूरमध्ये उच्चस्तरीय बैठक दुपारी बोलावली होती. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ‘ट्विट’ केले, की गृह मंत्रालयाने कन्हैयालाल यांच्या हत्येची चौकशी करण्याचे निर्देश ‘एनआयए’ला दिले आहेत. ते म्हणाले, या हत्येमागे कुठली संघटना अथवा आंतरराष्ट्रीय सहभाग आहे का, याचा सखोल तपास केला जाईल.

रियाझ अख्तरीने कन्हैयालाल यांची हत्या केली, तर गौस मोहम्मदने त्याचे चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर समाजमाध्यमांवर प्रसारित चित्रफितीत कथित हल्लेखोरांपैकी एकाने कन्हैयालाल यांची हत्या केल्याचे जाहीर केले. हातातील शस्त्र दाखवत ‘हे शस्त्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते’, अशी धमकी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती. प्रेषितांच्या अपमानाबद्दल भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल यांना स्थानिक पोलिसांनी समाजमाध्यमांवर वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात त्यांना नंतर जामीन मिळाला होता. १५ जून रोजी कन्हैयालाल यांनी पोलिसांना धमक्या येत असल्याची तक्रार दाखल केली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी दोन्ही बाजूंना पोलीस ठाण्यात बोलावून हे प्रकरण मिटवले होते.

सहाय्यक उपनिरीक्षक निलंबित

याआधी १७ जून रोजी आणखी एक प्रक्षोभक चित्रफीत बनवण्यात आली होती. त्यात अख्तरीने आपण ही हत्या कोणत्या दिवशी करणार, याची माहिती देणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी समाजातील इतर सदस्यांनाही असेच हल्ले करण्याचे आवाहन केले होते. ही चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर तणाव वाढला. या हत्येनंतर निष्काळजीपणाच्या आरोपाखाली संबंधित सहाय्यक उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.

जमावाकडून दगडफेक

मंगळवारी स्थानिक बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. जमावाने अनेक ठिकाणी दगडफेक करून, दोन मोटारसायकली पेटवून दिल्या. अनेक तास दुकानदारांनी पोलिसांना मृतदेह ताब्यात घेण्यापासून रोखले आणि आरोपींना अटक आणि कन्हैयालाल यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये नुकसानभरपाई व मुलास सरकारी नोकरी देण्याची मागणी केली. शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून, मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हल्लेखोरांचा पाकिस्तानशी संबंध?

  • उदयपूरमधील हत्येचा संबंध पाकिस्तानशी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजस्थानचे गृह राज्यमंत्री राजेंद्रसिंह यादव यांनी दावा केला आहे की, उदयपूर प्रकरणातील एक आरोपी कराचीला जाऊन आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक एम. एल. लाथेर यांनीही याला दुजोरा दिला असून घौस मोहम्मद या आरोपीने कराचीमध्ये ‘दावत- ए- इस्लामी’च्या कार्यालयाला भेट दिली होती, असे सांगितले.
  • उदयपूरमधील शिवणकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी मोहम्मद रियाज आणि घौस मोहम्मद यांना अटक करण्यात आली आहे. ‘‘२०१४ मध्ये घौस मोहम्मद कराचीला गेला होता आणि तिथे तो ४५ दिवस राहिला होता.  त्यानंतर २०१८-१९मध्ये तो अरब देशांच्या चळवळींमध्ये सहभागी झाला होता. काही दिवस नेपाळलाही जाऊन आला आहे. त्याला पाकिस्तानातील ८ ते १० दूरध्वनी क्रमांकावरून सातत्याने कॉल येत होते,’’ असे यादव म्हणाले.
  • घौस मोहम्मदची सखोल चौकशी करण्यात येत असून तो दावत-ए- इस्लामी या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. या संघटनेच्या काही सदस्यांच्या संपर्कात तो होता, असे लाथेर यांनी सांगितले.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udaipur murder nia internet services shut down places ysh
First published on: 30-06-2022 at 01:09 IST