तमिळनाडूच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. तमिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि अभिनेते विजय यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केली आहे. राजकीय मुद्द्यांवरून सुरू झालेला हा वाद आता थेट कौटुंबिक आयुष्यापर्यंत पोहोचला आहे.

काय म्हणाले उदयनिधी स्टालिन?

मुख्यमंत्री विजय यांनी नुकतीच आंदोलक शेतकऱ्यांवर टीका केली होती. शेतकरी विरोधकांच्या सांगण्यावरून आंदोलन करत असल्याचे विजय यांनी म्हटले होते. यावर आक्षेप घेत उदयनिधी स्टालिन यांनी सोशल मीडियावर थेट विजय यांच्या वैयक्तिक आयुष्यावर निशाणा साधला. स्टालिन म्हणाले, “शेतकऱ्यांनी विरोधकांच्या सांगण्यावरून आंदोलन केल्याचे म्हणून विजय यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. ते त्यांची ‘छोटी गोष्ट’ सांगून शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवत आहेत. पण, संपूर्ण तमिळनाडूला ‘चेंगलपट्टू कोर्टात पतीला शोधणाऱ्या पत्नीची’ खरी गोष्ट ठाऊक आहे. त्यामुळे अभिनेता विजय यांनी किमान आतातरी या गोष्टी विसराव्यात.”

उदयनिधी यांचा रोख मुख्यमंत्री विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे होता. विजय यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी डिसेंबर २०२५ मध्ये चेंगलपट्टू फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या २७ वर्षांच्या संसाराचा हा कायदेशीर शेवट असून, सध्या या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे. याच मुद्द्यावरून स्टालिन यांनी विजय यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

विधानसभेत काय घडले?

या वादाची ठिणगी तमिळनाडू विधानसभेत पडली. मुख्यमंत्री विजय यांनी द्रमुक पक्षावर गंभीर आरोप केले. पक्षाच्या निधी संकलनाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट झाली असून, आपले सरकार हा पैसा परत मिळवेल, असे विजय म्हणाले. तसेच, टीव्हीके सरकार कधीही भ्रष्टाचार करणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.

या भाषणामुळे सभागृहात गदारोळ झाला. उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यांची मागणी केली. याच दरम्यान, मुख्यमंत्री विजय यांनी माजी मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्या एका जुन्या हाताच्या इशाऱ्याची नक्कल केली, ज्यामुळे द्रमुकचे आमदार अधिकच आक्रमक झाले.

“विधानसभेला शूटिंग स्पॉट बनवले”

सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना उदयनिधी स्टालिन यांनी विजय यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “टीव्हीके पक्षाने विधानसभेला थेट सिनेमा थिएटर बनवले आहे. मुख्यमंत्र्यांचे ३० मिनिटांचे भाषण फक्त सोशल मीडियाच्या ‘रील्स’साठी होते. ते स्क्रिप्टेड आणि कृत्रिम होते. आता विधानसभेत कॅराव्हॅन, मेकअप आर्टिस्ट आणि स्टंट मास्टर येणेच बाकी आहे,” असा टोला स्टालिन यांनी लगावला. राजकीय आरोपांना उत्तर देताना उदयनिधी यांनी मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक वादाचा जाहीर उल्लेख केल्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात सध्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.