Udayanidhi Stalin Sanatana Dharma Controversy: द्रमुक पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी तमिळनाडूच्या विधानसभेत सनातन धर्माबद्दल केलेले वक्तव्य वादात सापडले आहे. उदयनिधी यांनी विधानसभेत बोलत असताना, “लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करायला हवं”, असं वक्तव्य केले. यावेळी मुख्यमंत्री जोसेफ विजय देखील सभागृहात उपस्थित होते. उदयनिधी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, भाजपाने नाराजी व्यक्त करत स्टॅलिन यांच्यावर टीका केली.
विजय यांची रिअॅक्शन चर्चेत
उदयनिधी स्टॅलिन विधानभवनात भाषण करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री जोसेफ विजय देखील उपस्थित आहेत. उदयनिधी आणि सनातन धर्माबद्दल वक्तव्य केले त्यावेळी मुख्यमंत्री विजय शांतपणे ऐकत असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे. उदयनिधी यांनी भाषण समाप्त केल्यानंतर विजय यांनी त्यांना हात जोडल्याचे देखील व्हिडीओत दिसत आहे. उदयनिधी यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री विजय यांनी दिलेल्या रिअॅक्शनही चर्चेचा विषय ठरली आहे.
उदयनिधी यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
उदयनिधी यांनी यापूर्वी देखील सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. “काही गोष्टींना केवळ विरोध करून चालत नाही, तर त्या नष्टच करायला हव्यात. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपल्याला त्यांचे निर्मूलन करावे लागेल; त्याचप्रमाणे आपल्याला सनातनचे निर्मूलन करायचे आहे,” असं विधान स्टॅलिन यांनी केले होते. या विधानामुळे स्टॅलिन वादात सापडले होते. मद्रास उच्च न्यायालयाने देखील स्टॅलिन यांचे हे विधान ‘द्वेषपूर्ण’ असल्याचे निरीक्षण नोंदवले होते.
डीएमकेकडून उदयनिधी यांचे समर्थन
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे डीएमकेचे प्रवक्ते टी. के. एस. एलंगोवन यांनी देखील समर्थन केले. “मनुधर्म ही दक्षिणेची संस्कृती नाही. दक्षिण भारत हा एक समतावादी समाज आहे… उत्तरेत तसे नाही. जन्मानेच लोकांची चार वर्गांमध्ये विभागणी केली जात असे. आम्ही ते स्वीकारणार नाही. ती प्रथा तामिळनाडूमध्ये आली आहे. ती आमची संस्कृती नाही”, असे एलंगोवन म्हणाले.
भाजपाचे केसवन काय म्हणाले?
याप्रकरणी भाजपाने उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली. उदयनिधी यांची ही ‘विषारी बडबड’ असल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी केली. “तमिळनाडूतील जनता त्यांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा अपमान कधीही विसरणार नाही आणि अशा लोकांना माफही करणार नाहीत. उदयनिधी स्टॅलिन हे तमिळनाडूचे राहुल गांधी आहेत, जे फुटीरतावादी द्वेषाचे राजकारण करत आहेत”, अशा शब्दात केसवन यांनी स्टॅलिन यांना खडेबोल सुनावले. “राहुल गांधी यांच्याप्रमाणे उदयनिधी स्टॅलिन यांनाही तमिळनाडूच्या जनतेने सत्तेतून बाहेर काढले तरी त्यांची विषारी बडबड सुरूच आहे”, असा हल्लाबोल केसवन यांनी केला.
भाजपाकडून टीका
भाजपाच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया हँडलवरुन देखील उदयनिधी यांच्यावर टीका करण्यात आली. “तमिळनाडूच्या जनतेने त्यांचा पक्ष आणि विचारधारा नाकारली आहे त्यामुळे राज्याचा कल काय आहे हे स्पष्ट दिसून येते”, अशा टीका भाजपाने केली. “याच उदयनिधी यांनी सनातन धर्माची यापूर्वी डेंग्यू, मलेरिया या आजारांशी तुलना केली होती, त्यांनी आता पुन्हा एकदा सनातन धर्माबद्दल गरळ ओकली आहे”, असे टीकास्त्र भाजपाने सोडले.
