TVK MLA Mustafa Udayanidhi Remark: द्रमुक पक्षाचे आमदार उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. यात आता मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाने उडी घेतली आहे. टीव्हीके पक्षाच्या आमदाराने उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना, “आम्ही देखील सनातन धर्माच्या उच्चाटनासाठी जमिनीवर संघर्ष करत आहेत”, असे मत मांडले. यावरुन भाजपा नेते के. अण्णामलाई यांनी डीएमके आणि टीव्हीकेवर जोरदार टीका केली आहे. “डीएमके आणि टीव्हीके एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत”, अशी टीका अण्णामलाई यांनी केली. 

उदयनिधी यांच्या वक्तव्याचे टीव्हीके आमदाराकडून समर्थन

आमदार उदयनिधी स्टॅलिन यांनी विधानसभेत बोलत असताना, “लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करायला हवं”, असं वक्तव्य केले. यावेळी मुख्यमंत्री जोसेफ विजय देखील सभागृहात उपस्थित होते. उदयनिधी यांच्या वक्तव्याने भाजपासह विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. हा वाद नवा असतानाच आता सत्ताधारी टीव्हीके पक्षाच्या आमदाराने उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. “सनातन धर्माच्या उच्चाटनासाठी आम्ही जमिनीवरची लढाई लढत आहोत”, असे टीव्हीके पक्षाचे आमदार व्ही.एम.एस मुस्तफा माध्यमांशी बोलताना म्हणाले.

नेमकं काय म्हणाले टीव्हीके आमदार व्ही.एम.एस मुस्तफा?

आमदार मुस्तफा यांना उदयनिधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पत्रकारांकडून मत विचारण्यात आले. यावेळी मुस्तफा यांनी, “पेरियार आणि आंबेडकरी विचारांच्या साथीने, आम्ही सनातन धर्माच्या उच्चाटनाच्या मुद्द्यावर प्रत्यक्ष मैदानात संघर्ष करत आहोत,” असे मत मांडले. भाजपा नेते अण्णामलाई यांनी उदयनिधी आणि मुस्तफा यांचा व्हीडीओ एक्सवर पोस्ट करुन दोन्ही पक्षावर कठोर शब्दात टीका केली आहे. 

अण्णामलाई यांच्याकडून टीका

“उदयनिधी यांनी विधानसभेत सनातन हिंदू धर्माचे उच्चाटन करण्याचे वक्तव्य केल्यानंतर आता टीव्हीके आमदार मुस्तफा यांनी या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ही बाब दुर्दैवी आहेच पण, अर्थपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या धर्माबद्दल यांच्या मनात असलेला द्वेष देखील दिसून येतो. डीएमके आणि टीव्हीके एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सनातन हिंदू धर्मावर सातत्याने केलेल्या आघातांमुळे आपली काय स्थिती झाली आहे, याचा विसर बहुधा डीएमकेला पडला असावा. टीव्हीकेला देखील लवकरच याची प्रचिती येईल”, अशी टीका अण्णामलाई यांनी केली. 

जनता प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही – अण्णामलाई 

“सनातन हिंदू धर्माला लक्ष्य करणे हाच त्यांच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू असेल हे त्यांनी निवडणुकीच्या प्रचारातच जाहीर करायला हवे होते. पण, धर्मनिरपेक्षता आणि नाटकीपणाच्या आधारे खरी रणनीती लपवून ठेवत जनतेच्या विश्वासाच्या जोरावर मते मिळवली, आज त्याच श्रद्धेचा ते अपमान करत आहेत. सनातन हिंदू धर्म टीका करण्याचे साधन नाही. जनता त्यांना योग्य प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास अण्णामलाई यांनी व्यक्त केला.

मनु-धर्माला आमचा विरोध – डीएमके

“सनातन म्हणजे अविनाशी. आणि अविनाशी काय आहे तर तो मनु-धर्म, असं ते मानतात पण बोलत नाहीत. द्रविड चळवळ हिंदूंसाठी सुरू झाली होती. सर्वांना समान वागणूक मिळावी अशी आमची इच्छा आहे. मनु-धर्माला आमचा विरोध आहे,” असे डीएमके नेते टी. के. एस. एलंगोवन म्हणाले.