द्रमुक पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी तमिळनाडूच्या विधानसभेत सनातन धर्माबद्दल केलेले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. उदयनिधी यांनी तमिळनाडूच्या विधानसभेत बोलत असताना, “लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करायला हवं”, असं वक्तव्य केलं. यावेळी मुख्यमंत्री जोसेफ विजय देखील सभागृहात उपस्थित होते आपण जाणून घेऊ हे वक्तव्य करणारे उदयनिधी स्टॅलिन कोण आहेत.

उदयनिधी स्टॅलिन नेमकं काय म्हणाले?

“लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सनातन धर्माचे निर्मूलन झाले पाहिजे” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं. अशा प्रकारे विधान करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी काही गोष्टींना केवळ विरोध करून चालत नाही, तर त्या नष्टच केल्या पाहिजेत. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा करोनाला केवळ विरोध करू शकत नाही, तर आपल्याला त्यांचे निर्मूलन करावे लागेल; त्याचप्रमाणे आपल्याला सनातनचे निर्मूलन करायचे आहे असं वक्तव्य केलं होतं. आता नव्याने स्थापन झालेल्या विधानसभेत हे विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. हे वादग्रस्त केल्याने उदयनिधी स्टॅलिन चर्चेत आहेत.

udayanidhi-stalin news
उदयनिधी स्टॅलिन यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? (फोटो-फेसबुक पेज)

कोण आहेत उदयनिधी स्टॅलिन?

उदयनिधी स्टॅलिन हे तमिळनाडू सरकारमध्ये क्रीडा मंत्री होते. तसंच एका युवा नेते म्हणूनही ते ओळखले जातात.

उदयनिधी स्टॅलिन हे डीएमके पक्षाचे प्रमुख आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा मुलगा आहेत.

उदयनिधी स्टॅलिन हे डीएमकडे पक्षाचे दिवंगत नेते आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे नातू आहेत.

उदयनिधी स्टॅलिन यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९७७ ला चेन्नईतल्या अलवरपेट या ठिकाणी झाला आहे.

उदयनिधी स्टॅलिन हे राजकारणात येण्यापूर्वी चित्रपटात काम करत होते. ते अभिनेताही आहेत आणि निर्माताही आहेत.

राजकारणात येण्यापूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांना राजकारणाचा वारसा घरातच

उदयनिधी यांना राजकारणाचा वारसा हा त्यांच्या घरातच मिळाला. तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांनी करिअर केलं. त्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी कौटुंबिक वारसा सांभाळत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये उदयनिधी स्टॅलिन यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. २०२१ उदयनिधी स्टॅलिन यांनी थिरुवल्लिकेनी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते जिंकूनही आले. डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. जनतेशी संवाद साधण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते अनेकदा सोशल मीडियावर जनतेसह फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत असतात.

udayanidhi-stalin
उदयनिधी स्टॅलिन यांना अटक का झाली होती? (फोटो-सोशल मीडिया)

उदयनिधी स्टॅलिन यांना अटक का झाली होती?

करोना काळात उदयनिधी स्टॅलिन यांनी जनसपंर्क अभियान राबवलं होतं. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. काही तासांनी त्यांना सोडण्यात आलं. २०२१ मध्ये भाजपा नेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या मृत्यूबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे उदयनिधी स्टॅलिन चर्चेत आले होते.

उदयनिधी स्टॅलिन यांना पक्षातून विरोध नाही

उदयनिधी स्टॅलिन यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. पण यावेळेला म्हणजेच २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. दरम्यान स्टॅलिन यांच्यावर घराणेशाहीचाही आरोप झाला आहे. कारण घराणेशाहीची सुरुवात एम. करुणानिधी यांनी केली होती. करुणानिधी यांनी त्यांची दोन्ही मुलं म्हणजेच एम. अलागिरी आणि एम. के. स्टॅलिन तर मुलगी कनिमोळी यांना पक्षात आणलं. त्यानंतर एम के. स्टॅलिन यांनीही त्यांच्या मुलाला म्हणजेच उदयनिधी स्टॅलिन यांना राजकारणात आणलं. उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्रिपदही देण्यात आलं होतं. पण २०२६ मध्ये त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही.

उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपाची टीका

दरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत जे विधान केलं त्यानंतर भाजपाचे प्रवक्ते सी. आर केसवन यांनी जोरदार टीका केली. केसवन म्हणाले, “अशा वारंवार चुका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तमिळनाडूच्या राज्य चिन्हावर मंदिराचा गोपुरम (शिखर) आहे. तमिळनाडूतील जनता त्यांच्या श्रद्धेचा आणि भावनांचा असा घोर अपमान कधीही विसरणार नाही आणि माफही करणार नाही.” केसवन यांनी उदयनिधी यांच्यावर टीका करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “उदयनिधी स्टॅलिन हे तमिळनाडूचे राहुल गांधी आहेत, जे फुटीरतावादी द्वेषाचे राजकारण करत आहेत. राहुल गांधींनी पवित्र सेंगोलची थट्टा केली आणि राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अपमान करून त्यावर बहिष्कार टाकला. ज्याप्रमाणे राहुल गांधींना गेल्या ३ लोकसभा निवडणुकीत नाकारण्यात आले आहे, त्याचप्रमाणे उदयनिधी स्टॅलिन यांनाही तमिळनाडूच्या जनतेने सत्तेतून बाहेर काढले असले तरी त्यांची विषारी बडबड सुरूच आहे.”