काँग्रेसने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. त्यानंतर रात्री उशिरा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांच्यासह खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाईही होते. उद्धव ठाकरे यांनी सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांना आम्ही तुमच्याबरोबर शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका असा सल्ला दिला. तसंच मोदी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार उलथवून टाका म्हणजे तुम्हाला न्याय मिळेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंचं वक्तव्य नेमकं काय?

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन फक्त चालणार नाही आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर व्यवस्था बदलली पाहिजे. सत्ता बदल झाल्याशिवाय तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात बदल होणार नाही. काहीही झालं तरीही तुम्ही आंदोलनातून माघार घेऊ नका, तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

तुमचं आंदोलन योग्यच आम्ही तुमच्या पाठिशी आहोत-उद्धव ठाकरे

मी पाहिलं आंदोलन करताना काही गुंड तुमच्यावर लाठ्या चालवत होते. मी पाहिलं काल त्यांच्यापैकी एकाचा फोटो तुम्ही वाँटेड म्हणून व्हायरल केला आहे, तुमचं बरोबर आहे अगदी असंच करा. कुठे जातील हे लोक? आज ते खुर्चीवर बसले आहेत उद्या तुमच्यापैकी कुणीतरी तिथे खुर्चीवर बसलं असेल अनेक लोक बसतील तेव्हा आपण बघून घेऊ. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.अभिजीत दिपकेचे तर विशेष आभार मानतो. कारण तो अमेरिकेत होता, तिथे शिक्षण घेत होता. त्याला काय गरज होती इथे यायची? तरीही तो आला कारण विद्यार्थ्यांच्या वेदना पाहून त्याला त्रास झाला. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या सगळ्यांचे फोटो आंदोलन स्थळी लावा. जरा याद करो कुर्बानी हे गाणं विसरु नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आंदोलनातून मागे हटू नका, तुम्हाला हिंमत द्यायला मी इथे आलोय-उद्धव ठाकरे

आंदोलनाची सुरुवात खूप चांगली झाली आहे. दिल्लीत तुम्ही तुमचं आंदोलन करत राहा. संपूर्ण देशात या आंदोलनाची आग विझता कामा नये. महाराष्ट्रात आम्ही सुरुवात केली आहे. मला अभिमान आहे की महाराष्ट्राचा युवक तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व करतो आहे. तुम्ही मुळीच घाबरु नका, तुम्ही जी हिंमत सोमवारी दाखवली त्याला मी वंदन करतो. धर्माच्या नावावार अनेक लोक अनेकांना वाटू पाहात होते. पण आज वन नेशन वन इमोशन ही भावना मला दिसते आहे. ही फार महत्त्वाची आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.