जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात एक खासगी प्रवासी बस डोंगरावरून कोसळून झालेल्या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आणि २९ जण जखमी झाले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या बसने आधी एका ऑटोरिक्षाला धडक दिली, त्यानंतर ती डोंगरावरून खाली पडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की या धडकेत ऑटोरिक्षातील प्रवासी जखमी झाले, पण त्यापैकी कोणाचाही मृत्यू झाला नाही.

उधमपूर जिल्ह्यातील रामनगर भागातील कागोर्ट या गावाजवळ एक धोकादायक वळण ओलांडताना बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. सकाळी १०च्या सुमाराला हा अपघात घडला तेव्हा तेथून लष्कराचा ताफा जात होता. त्यांनी तातडीने बचावकार्याला सुरुवात केली. या अपघातात बसचा वरील भाग पूर्णपणे फाटला गेला. बसच्या उरलेल्या सांगाड्यातून प्रवाशांना वाचवणे हे अतिशय आव्हानात्मक होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधून ५० जण प्रवास करत होते. त्यापैकी बहुसंख्य जण रामनगर येथून उधमपूरला रोजच्या कामासाठी जात होते.

मदत जाहीर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. सिन्हा आणि अब्दुल्ला यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शक्य ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले. तर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांनी प्रत्येकी दोन लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले.

उधमपूरमधील बस अपघातात जीवितहानीबद्दल ऐकून दुःख झाले. मी मृतांच्या आप्तेष्टांचे सांत्वन करतो आणि जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करतो.– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

या संकटाच्या वेळी सरकार या अपघातातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहे. आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे. – ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर