Udhayanidhi Stalin Trisha Double Meaning comment latest updates : तमिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघम अर्थात DMK चे नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.ही घटना तंजावूर येथे कर्नाटक-तमिळनाडू कावेरी नदी पाणीवाटप वादावरील सभेदरम्यान घडली.

नेमकं काय घडलं?

तंजावूर येथे कर्नाटक-तमिळनाडू कावेरी नदी पाणीवाटप वादासंदर्भात सभा होती. या सभेला उदयनिधी स्टॅलिन संबोधित करत होते. ते बोलायला सुरुवात करणार तेवढ्यातच त्रिशा… त्रिशा… अशा घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे उदयनिधी स्टॅलिन काही क्षण थांबले. नंतर स्मितहास्य करत कावेर नदी प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी एक टिप्पणी केली. त्यांच्या वक्तव्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला.

TVK च्या आरोपानुसार, उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेली टिप्पणी अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबाबत दुहेरी अर्थ असलेली आणि आक्षेपार्ह होती. पक्षाचे आमदार रेवन्थ चरण यांनी या वक्तव्याचा निषेध करत ते वक्तव्य अत्यंत घृणास्पद असल्याचं म्हटलं. तसंच DMK नेतृत्वामुळे राजकीय चर्चेची पातळी घसरल्याचा आरोपही त्यांनी केला.

विरोधकांकडून आणि सोशल मीडियावर टीका

रेवन्थ चरण यांनी म्हटलं की, “कोणत्याही व्यक्तीबद्दल अशा प्रकारच्या अपमानास्पद टिप्पणी करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. यावरून संबंधितांची मानसिकता, राजकीय संस्कृती आणि राजकारणातील घसरलेली पातळी स्पष्ट होते.”

MDMK चे प्रमुख सचिव आणि राज्यसभा खासदार दुरई वायको यांनीही या कथित वक्तव्याचा निषेध केला. “ही सभा कावेरी प्रश्न आणि तमिळनाडूतील शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित असायला हवी होती. अशा प्रकारची महिलांविरोधातील टिप्पणी निषेधार्ह असून वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी हे व्यासपीठ नव्हते”, असं त्यांनी म्हटलं. सोशल मीडियावरही अनेकांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका केली. काहींनी त्यांच्या वक्तव्याला अश्लील आणि महिलांचा अपमान करणारं संबोधलं, तर काहींनी ते स्वस्त लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं.

टीव्हीकेचे नेते आधव अर्जुना आणि एन. आनंद यांनीही डीएमकेवर टीका करत अशा प्रकारच्या वर्तनामुळे पक्षाची मानसिकता आणि राजकीय संस्कृती उघड झाल्याचा आरोप केला. या प्रकरणाच्या निषेधार्थ टीव्हीकेने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

डीएमकेकडून स्पष्टीकरण

डीएमकेने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पक्षाचे नेते टी. आर. बालू यांनी उदयनिधी स्टॅलिन यांनी कोणत्याही विशिष्ट महिलेचा उल्लेख केलेला नसून त्यांच्यावरील आरोप पूर्णपणे खोटं असल्याचं म्हटलं. दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतरच्या दृश्यांमध्ये पोलीस त्यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेऊन वाहनातून नेत असल्याचं दिसून आलं.