Udhayanidhi Stalin Trisha Krishnan Remark: द्रमुक नेते आणि विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबाबत केेलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे तमिळनाडूमध्ये राजकारण तापलं आहे. मंगळवारी स्टॅलिन यांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली. स्टॅलिन यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. भाजपा नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी स्टॅलिन यांच्यावर टीका करत संताप व्यक्त केला आहे. “स्वतःला नेता म्हणवून घेताना त्यांना लाज वाटली पाहिजे”, अशी टीका सुंदर यांनी केली.

उदयनिधी यांना अटक आणि सुटका

खुशबू सुंदर एनडीटीव्हीच्या राजकीय चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या, यावेळी त्यांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तंजावर येथे कावेरी आंदोलनादरम्यान, द्रमुक नेते स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशा यांना उद्देशून पाण्यावरुन डबल मिनिंग वक्तव्य केले होते. त्रिशा मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सहकलाकार आणि जवळच्या मैत्रिणी देखील आहेत. स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर जमावाने देखील जोरदार घोषणाबाजी केली. यावरुन सध्या स्टॅलिन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. स्टॅलिन यांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली होती आणि रात्री आठच्या सुमारास चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली.

त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापही दिसत नाही – खुशबू सुंदर

स्टॅलिन यांच्यावर टीका करताना भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी अनेकदा अशा लैंगिक स्वरूपाच्या शेरेबाजीचा सामना करावा लागल्याचे नमूद केले. तसेच, स्त्रीद्वेष हा द्रमुकच्या परंपरेचा भाग असल्याचे त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना नमूद केले. “मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. मी या प्रकारचा स्त्रीद्वेष, लैंगिक शेरेबाजी पाहिली आहे. आणि यापूर्वीही द्रमुक पक्षात महिलांचा छळ झाल्याचे मी पाहिले आहे. मला उदयनिधी स्टॅलिन यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, कारण ते तरुण आहेत आणि विरोधी पक्षनेते आहेत. ते माजी उपमुख्यमंत्री आणि युवा कल्याण मंत्री होते, त्यामुळे हा माणूस वेगळा असेल, असे मला वाटले होते. पण उदयनिधी स्टॅलिन अशी अत्यंत अश्लील वक्तव्य करत आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापही दिसत नाही,” असे सुंदर म्हणाल्या.

नेता म्हणवून घेताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे – सुंदर

“सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? स्वत:चा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुम्ही आणखी किती काळ महिलांचा अपमान करणार? स्वतःला नेता म्हणवून घेताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे,” असा संताप सुंदर यांनी व्यक्त केला. “तुमच्यात खरोखरच पुरुषार्थ असेल आणि तुम्ही स्वतःला नेता म्हणवून घेत असाल, तर कोणत्याही महिलेचा अपमान न करता लोकांसमोर उभे राहा. तुम्हाला ते जमते का बघू,” असेही सुंदर म्हणाल्या. “द्रमुक भ्रमाच्या फुग्यात जगत होता. तो फुगा या निवडणुकीने फुटला आहे,” अशा शब्दात सुंदर यांनी द्रमुकवर टीका केली.