Udhayanidhi Stalin wife video news updates : कावेरी पाणी वाटप प्रकरणावरून तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चात त्यांनी अभिनेत्री त्रिशाबद्दल द्विअर्थी वक्तव्य केल्याचा दावा केला जातोय. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, पोलीस त्यांना ताब्यात घेण्याकरता गेलेले असताना ते प्रसाधनगृहात होते. त्यामुळे ते बाहेर येईपर्यंत वाट पाहण्याची विनंती उदयनिधी यांच्या पत्नी कृतीगा उदयनिधी करत होत्या. त्यांच्या या संवादाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आम्ही बेकायदेशीर काम करत नाहीत
“ते सध्या प्रसाधनगृहात गेले आहेत. कृपया थोडा वेळ द्या”, असं कृतीगा पोलिसांना सांगत आहेत. हा व्हिडिओ उदयनिधी यांच्या चेन्नईतील निवासस्थानांमधील आहे. या फुटेजमध्ये कृतीगा, पोलीस अधिकारी आणि तमिळनाडूचे मंत्री सुब्रमण्यम यांच्यातील संक्षिप्त संवाद कैद झाला आहे. उदयनिधी यांना ताब्यात घेण्यापूर्वी पोलीस अधिकारी घरात त्यांची वाट पाहत थांबले आहेत. “आम्ही बऱ्याच वेळेपासून वाट पाहत आहोत. मी इथे कोणतेही बेकायदेशीर काम करत नाही आहे”, असं एक पोलीस अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असल्याचं ठामपणे सांगत आहे.
“कृपया थोडावेळ द्या”
तमिळ चित्रपटसृष्टीतील चित्रपट निर्मात्या आणि लेखिका असलेल्या कृतीगा उदयनिधी यांनी अधिकाऱ्यांना उत्तर देताना सांगितलं की, त्यांचे पती अजून तयार होत आहेत. “ते प्रसाधनगृहात आहेत. कृपया थोडा वेळ द्या”, असं म्हणत त्यांनी पोलिसांना थोडी अजून वाट पाहण्याची विनंती केली. निवासस्थानी उपस्थित असलेले तमिळनाडूचे मंत्री सुब्रमण्यम यांनीही अधिकाऱ्यांना आणखी काही वेळ देण्याचं आवाहन केलं. कारवाईला काही मिनिटे उशीर झाल्यास फारसा फरक पडणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. “तुम्ही त्यांना सकाळी साडेनऊ वाजता किंवा साडेदहा वाजता नेलं, तरी जनतेकडून तसाच प्रतिसाद मिळेल आणि ११ वाजताही तेच होईल. जसजसा वेळ जाईल, तसतशी इथे गर्दी वाढेल”, असं सुब्रमण्यम म्हणाले.
परंतु, पोलीस अधिकाऱ्यांनी जास्त वेळ पाहण्यास नकार दिला. “आम्ही जास्त वेळ वाट पाहू शकत नाही. आम्ही किती वेळ थांबणार? ते १० मिनिटे, १० मिनिटे असं सांगत आहेत. हे आमचं काम आहे. आम्ही कायद्याचे उल्लंघन करणार नाही. जर आम्ही कायद्याचं उल्लंघन करत आहोत असं तुम्ही दाखवून दिलं, तर मी मान्य करेन. जर असं काही नाहीय तर तेव्हा तुम्ही आम्हाला आमचं काम करू दिलं पाहिजे”, असं पोलीस अधिकारी म्हणाले.
सुब्रमण्यम यांनी थोडा वेळ थांबण्याचा आग्रह सुरूच ठेवला आणि म्हणाले, “त्यांना बाथरूममधून बाहेर येऊ द्या. कृपया १० मिनिटे वाट पाहा. तोपर्यंत वकील सरवणन सुद्धा इथे पोहोचतील.” सुब्रमण्यम यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, उदयनिधी यांना तंजावरला नेले जात आहे, जो जवळपास आठ तासांचा प्रवास आहे, त्यामुळे निघण्यापूर्वी त्यांना त्यांची सकाळची दिनचर्या पूर्ण करण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यावर अधिकाऱ्याने पुन्हा एकदा विचारलं, “मी कायद्याचं उल्लंघन करत आहे का?”
कावेरी पाणीवाटप वादावरून ३ ऑगस्ट रोजी तामिळनाडूच्या तंजावर येथे डीएमकेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनातील उदयनिधी यांच्या भाषणानंतर ही पोलीस कारवाई करण्यात आली आहे. या रॅलीदरम्यान, जमावातील काही घटकांनी वारंवार अभिनेत्री त्रिशाच्या नावाच्या घोषणा दिल्या, ज्यावर उदयनिधी यांनी एक द्विअर्थी टिप्पणी केली. या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय संताप निर्माण झाला आणि त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या.
उदयनिधी यांना जामीन
अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल असल्याचे अनेकांनी अर्थ लावलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना त्याच दिवशी स्टेशन जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले.
