Udupi Rape Case : इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या एका व्यक्तीने २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना कर्नाटकातील उडुपी येथे घडली आहे. या तरुणीला अंमल पदार्थ पाजवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं कर्नाटक पोलिसांनी म्हटलं असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसंच, विरोधी पक्ष भाजपाने मात्र याला लव्ह जिहाद षडयंत्राचा आरोप केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “एका खासगी कंपनी काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची अत्लाफ याच्याशी तीन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दोघे अनेकदा बोलत असत. शुक्रवारी त्याने तिला एक जागा दाखवण्याच्या निमित्ताने एका ठिकाणी नेले. तिथं तिला दारू पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ती रडायला लागली तेव्हा अल्ताफने तिला घरी सोडलं.”
याप्रकरणी महिलेने करकला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अल्ताफ आणि काडोर्झा यांना अटक केली आहे. परंतु, भाजपा आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी या प्रकरणाला लव्ह जिहादचं नाव दिलंय. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
भाजपाकडून लव्ह जिहादचा आरोप
भाजपाचे सरचिटणीस आणि करकलाचे आमदार व्ही सुनील कुमार म्हणाले, “हिंदू मुलींना लक्ष्य केले जात असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. राज्य सरकार किंवा पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करत नाहीत. असे दिसते की ते सुनियोजित होते आणि आरोपींना भीती वाटत नाही.”
दरम्यान, उडुपी जिल्हा मुस्लिम मंचाने या घटनेचा निषेध केला असून वकिलांना न्यायालयात आरोपीचे प्रतिनिधित्व करू नये असे आवाहन केले आहे. सरचिटणीस मोहम्मद शरीफ म्हणाले की, अशा घटना मानवतेला आणि समाजालाही लांच्छनास्पद आहेत.