UGC-NET च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक मोठा निर्णय घेतला आहे. यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी किंवा अनेक चुका आढळून आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर एका तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनंतर अखेर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक्सवर (ट्विटर) एक निवेदन प्रसिद्ध करत या संदर्भातील माहिती दिली आहे.

यूजीसी नेटच्या विद्यार्थ्यांना आता या तीन विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. मात्र, या तीन विषयांच्या होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क विद्यार्थ्यांना द्यावं लागणार नाही. तसेच इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या परीक्षा ९ आणि १० सप्टेंबर रोजी होतील, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने २२ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभरात एकूण ८७ विषयांसाठी परीक्षा घेतल्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर लगेच, इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती, त्यानंतर समितीने तपासणी केल्यानंतर या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर चुका आढळून आल्या होत्या.

प्रश्नपत्रिकांमध्ये तथ्यात्मक चुका, भाषांतरातील चुका आणि व्याकरणाच्या गंभीर चुका होत्या. शिवाय काही विचारवंत आणि अभ्यासकांची नावंही चुकीच्या पद्धतीने छापली गेली होती. अनेक जुने प्रश्न जसेच्या तसे पुन्हा विचारले गेले होते. याबाबत चौकशी समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केलं की, फेरपरीक्षा घेणं हाच एकमेव योग्य पर्याय आहे. त्यानंतर परिणामी एनटीएने या तीन विषयांसाठी फेर परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

NTA कडून नवं वेळापत्रक जाहीर

इंग्रजी : ९ सप्टेंबर २०२६ (सकाळी ९ ते दुपारी १२ पहिले सत्र)
वाणिज्य : ९ सप्टेंबर २०२६ (दुपारी ३ ते सायंकाळी ६ दुसरे सत्र)
समाजशास्त्र : १० सप्टेंबर २०२६ (सकाळी ९ ते दुपारी १२ पहिले सत्र)

तसेच परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्राबाबतची सर्व सविस्तर माहिती लवकरच संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली आहे.