मध्य प्रदेशातील उज्जैन येथील नागचंद्रेश्वर मंदिरात श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाल्याने किमान १३ जण बेशुद्ध पडले. नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर वर्षातून केवळ एकदाच भाविकांसाठी खुले केले जाते. यंदा नागपंचमीसोबत श्रावणचा तिसरा सोमवार आल्याने मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, भाविक हरसिद्धी मंदिरासमोरील बॅरिकेडिंग केलेल्या परिसरात दर्शनासाठी प्रतीक्षा करत होते. गर्दी वाढत असतानाच बॅरिकेडिंगच्या आतील बाजूला असलेल्या ट्रान्सफॉर्मरजवळ वीज गळती झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे काही काळ घबराट निर्माण झाली. गर्दी आणि गोंधळाच्या परिस्थितीत १३ भाविकांची प्रकृती बिघडून ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सर्व जखमींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मंदिर प्रशासनाने चेंगराचेंगरीच्या वृत्ताचे खंडण केले
महाकाल मंदिर प्रशासक प्रथम कौशिक यांनी एएनआयने सांगितले की, अत्यंत गर्दी असूनही नागचंद्रेश्वर मंदिरातील दर्शन सुरळीत सुरू आहे. “नागपंचमीच्या निमित्ताने श्री महाकालेश्वर मंदिरातील नागचंद्रेश्वर मंदिराचे दर्शन सुरू आहे. त्यामुळे हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे की मंदिरात कोणतीही चेंगराचेंगरी किंवा अशी कोणतीही घटना घडलेली नाही. सर्व भाविक अतिशय सुरळीतपणे दर्शन घेत आहेत. आज नागपंचमी आणि श्रावण सोमवार असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. आज दुपारी १२ वाजेपर्यंत ६ लाखांहून अधिक भाविकांनी भगवान नागचंद्रेश्वराचे आणि २ लाखांहून अधिक भाविकांनी भगवान श्री महाकालेश्वराचे दर्शन घेतले आहे. मंदिर प्रशासनाकडून सर्व भाविकांना शक्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत”.
बॅरिकेड उघडल्यानंतर गोंधळ
मंदिर प्रशासनाने मंदिराच्या आवारात कोणतीही घटना घडल्याचे नाकारले असले, तरी हरसिद्धी चौराहा परिसरातील भाविक जखमी झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जखमी भाविक सागरने सांगितले की, तो महाकाल मंदिरात दर्शनासाठी अनेक तास रांगेत उभा होता. सुमारे ७-८ तासांनंतर तो हरसिद्धी चौकात पोहोचला, जिथे त्याला आणखी दोन तास थांबावे लागले. आरतीची वेळ असल्याने भाविकांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यानंतर अचानक बॅरिकेड उघडण्यात आले आणि गर्दीत गोंधळ उडाला.
सागरच्या म्हणण्यानुसार, या वेळी तंबू आणि बॅरिकेड्स कोसळले. तो बॅरिकेडखाली अडकला आणि त्याच्या एका पायाला दुखापत झाली. त्याने मंदिरातील गर्दी व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले.
मदतीसाठी भाविकांची धावपळ
रुग्णालयात दाखल असलेल्या एका भाविकाच्या आईनेही घटनास्थळी पुरेशी मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. तिच्या म्हणण्यानुसार, नागचंद्रेश्वर मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना हरसिद्धी चौकात गोंधळ झाला आणि तिचा मुलगा बॅरिकेडखाली अडकला. तिने सांगितले की, सुरुवातीला कोणीही मदतीला आले नाही. अखेर एका व्यक्तीने त्याला बाहेर काढून आरोग्य शिबिरात नेले आणि तेथून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
