Ujjain Rape Case Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरातील आगर नाका भागात एक संतापजनक घटना घडली आहे. येथे एका कचरा व भंगार वेचणाऱ्या महिलेला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही घटना बुधवारी (४ सप्टेंबर) घडली आहे. एका इसमाने या महिलेला लग्नाचं वचन दिलं होतं. त्याने तिला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावलं आणि पदपथाच्या बाजूलाच त्याने तिच्यावर बलात्कार केला. घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्या इसमाने तिला याबाबत कुठेही काहीही न बोलण्याची धमकी दिली. दरम्यान, तो इसम महिलेबरोबर दुष्कर्म करत असताना त्या पदपथावरून लोक ये-जा करत होते. मात्र हे पादचारी महिलेला वाचवण्याऐवजी बलात्काराचा व्हिडीओ चित्रीत करत होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलीस अधीक्षक ओम प्रकाश मिश्रा यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की "आगर नाका परिसरात एका महिलेवर बलात्कार झाल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती व व्हिडीओ आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली आहे". हे ही वाचा >> Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती मिश्रा म्हणाले, आरोपी लोकेश याने पीडितेला लग्न करण्याचं वचन दिलं होतं. त्याने तिला मद्यप्राशन करायला लावलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार जिथे घडत होता तिथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रीत केला. वाटसरू महिलेला वाचवण्याऐवजी व्हिडीओ चित्रीत करत होते. बलात्कार करून लोकेश तिथून पळून गेला. मद्याची गुंगी उतरल्यानंतर महिलेने कोतवाली नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी लोकेशच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे ही वाचा >> Shilpa Shinde : “तसले कपडे घालून, मला खुश कर आणि…”, अभिनेत्री शिल्पा शिंदेचा निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा आरोप उज्जैनमध्ये आणखी एक संतापजनक घटना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उज्जैनमध्ये अशीच एक संतापजनक घटना घडली होती. येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. बलात्कार करून नराधमाने त्या लहान मुलीला रस्त्याकडेला टाकून पळून गेला. ती मुलगी तब्बल अडीच तास रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली होती. ताकद एकवटून ती उभी राहिली, रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांकडे मदत मागत होती. मात्र तिला कोणाकडूनही मदत मिळाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला अटक केली होती.