Ujjain Rape Case Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील उज्जैन शहरातील एका परिसरात काही दिवसांपूर्वी एक संतापजनक घटना घडली होती. या परिसरात एका कचरा व भंगार वेचणाऱ्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना ४ सप्टेंबर रोजी घडली होती. दरम्यान, तो इसम महिलेबरोबर दुष्कर्म करत असताना त्या पदपथावरून ये-जा करणाऱ्या लोकांनीही तिला वाचवलं नाही, तर एका व्यक्तीने महिलेला वाचवण्याऐवजी बलात्काराचा व्हिडीओ चित्रीत केला होता. यानंतर या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. तसेच बलात्काराचा व्हिडीओ चित्रीत करणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

यासंदर्भात माहिती देताना उज्जैनचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी म्हटलं की, “मध्य प्रदेश पोलिसांनी उज्जैनमधील फूटपाथवर एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी मोहम्मद सलीम (४२) हा ऑटोरिक्षा चालक आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस, सायबर आणि सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून या घटनेचा व्हिडीओ कोणी बनवला? तो व्हिडीओ व्हायरल कोणी केला? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती.”

हेही वाचा : मन सुन्न करणारी घटना! हॉस्पिटलचं ४ हजारांचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने वडिलांनी तीन वर्षांच्या मुलाला विकलं

“यानंतर पोलिसांनी शोध घेत काही तासांच्या आत व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपीची ओळख पटवली आणि आरोपीला अटक केली. या आरोपीचेही या पूर्वीचे गुन्हेगारी स्वरुपाचे रेकॉर्ड आहे. या घटनेतील आरोपीची चौकशी सुरु असून आरोपींचे मोबाईल तपासले जात आहेत”, असं पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितलं.

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, उज्जैन शहरातील एका वर्दळीच्या चौकांपैकी एका भागातील फूटपाथवर ४ सप्टेंबर रोजी महिलेवर बलात्कार झाला. ही घटना अनेक लोकांनी पाहिली. मात्र, तरीही कोणीही त्या महिलेला वाचवलं नाही. मात्र, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीने त्या महिलेला लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच तिला दारू पाजली होती आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर एका महिलेवर बलात्कार झाल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या घटनेची माहिती व व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर आरोपीला अटक केली. मात्र, व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल कोणी केला? आणि तो व्हिडीओ चित्रीत कोणी केला? याचाही आम्ही शोध घेतला. त्यानंतर या तपासासाठी आम्ही काही पथके तयार केली आणि बलात्काराचा व्हिडीओ काढणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.