रॉयटर्स, लंडन
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे माध्यम संचालक टीम ॲलन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचे निकटचे सहकारी मॉर्गन मॅकस्विनी यांनी एक दिवस आधीच राजीनामा दिला होता. अमेरिकेतील जेफ्री एप्स्टाइन प्रकरणाशी संबंध असलेले पीटर मँडेलसन यांना पाठिंबा दिल्यावरून मॅकस्विनी यांनी राजीनामा दिला होता.
प्रशासकीय फेरबदलाचा भाग म्हणून ॲलन यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. स्टार्मर यांच्या दोन घनिष्ठ सहकार्यांनी राजीनामा दिल्यामुळे प्रशासनाच्या पातळीवर त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्टार्मर यांनी २०२४ मध्ये मँडेलसन यांची नियुक्ती अमेरिकेचे राजदूत म्हणून करण्यात आली होती. एप्स्टाइनशी संबंध उघड झाल्यानंतर स्टार्मर यांनी त्यांची हकालपट्टी केली.
दरम्यान, प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन यांनी सोमवारी एका निवेदनात जेफ्री एप्स्टाइनच्या प्रकरणातील पीडितांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. माजी प्रिन्स अँड्र्यू यांचे एप्स्टाईनशी असलेले संबंध उघड झाल्यानंतर हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.
