ब्रिटनमध्ये रेल्वेमध्ये चाकूहल्ल्यात १० जण जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, ही दहशतवादी घटना असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे. हल्ल्यानंतर सुरुवातीला हा दहशतवादी हल्ला असल्याचे मानून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तपास सुरू केला होता. नंतर त्यांना तपासातून दूर करण्यात आले.

घटना घडलेली रेल्वे डॉनकॅस्टरपासून किंग्ज क्रॉस स्थानकाकडे जात होती. केंब्रिजशायर पोलिसांनी सांगितले, ‘‘आम्हाला शनिवारी रात्री ७.३९ वाजता घटनेची माहिती मिळाली. रेल्वेमध्ये अनेकांना चाकूने भोसकण्यात आल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यानंतर हंटिग्टन येथे रेल्वे थांबविण्यात आली. पोलिसांनी तेथे दोघांना अटक केली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.”

रेल्वेने पीटरबरो स्थानक सोडल्यानंतर हल्लेखोर आणि पोलिसांत धुमश्चक्री उडाली. पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर जखमी झाल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. ब्रिटनचे पंतप्रधानव कीर स्टार्मर यांनी घटनेचा निषेध केला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री शबाना मेहमूद यांनीही हल्ल्याचा निषेध केला आहे. घटनेवर इतक्यात कुणीही भाष्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले. घटनेशी संबंधित दोन संशयितांना तत्काळ अटक केली असल्याचे त्या म्हणाल्या.