चेर्निव्ह : पूर्व युक्रेनमधील क्रामाटोस्र्क रेल्वे स्थानकावर रशियाच्या सैनिकांनी शुक्रवारी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ३५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेन प्रशासनाने दिली. युद्धामुळे अनेक युक्रेनियन नागरिक देश सोडून जात असून त्यांना रशिया लक्ष्य करीत असल्याचे म्हटले जाते. 

क्रामाटोस्र्क रेल्वे स्थानकावर नागरिक जमले असतानाच रशियाच्या सैनिकांनी क्षेपणास्त्र हल्ला केला. रेल्वे स्थानकावर दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यात ३५ नागरिकांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जखमी झाले. युरोपमधील अनेक राष्ट्रांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. रशियाने क्षेपणास्त्र हल्ले करून युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख केली आहेत. युद्धामुळे अनेक युक्रेनियन नागरिकांनी मायभूमी सोडली असून अद्याप शेकडो नागरिक शेजारी देशांच्या आश्रयाला जात आहेत.