सध्या युक्रेनच्या ( Ukraine ) सीमेवर रशियाने (Russia) मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. विशेष म्हणजे युक्रेनच्या सीमेजवळच्या विमानतळांवर रशियाने मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानांसह आवश्यक वायुदल तैनात केलं आहे. युक्रेन जवळच्या काळ्या समुद्रात (Black Sea) आणि अझोव्ह समुद्रात (Sea of Azov) रशियाने युद्धनौकाही तैनात केल्या आहेत. थोडक्यात छोटेखानी युक्रेनवर हल्ला करण्याची पुर्ण तयारी रशियाने केली आहे. तसंच चर्चेची कोणतेही शक्यता राहीली नसल्याने प्रत्यक्ष युद्धाला कधीही सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

म्हणूनच युक्रेनमधील भारतीय दुतावासाने खबरदारीचा उपाय म्हणून सुचना जारी केल्या आहे. भारतीय नागरीकांना विशेषतः विद्यार्थ्यांना युक्रेन देश तात्पुरता का होईना सोडण्याच्या सुचना केल्या आहेत. अत्यावश्यक असेल तरच युक्रेनमध्ये राहा असं दुतावासाने भारतीय नागरीकांना स्पष्ट केलं आहे. जे युक्रेनमध्ये रहाणार आहेत त्यांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं दुतावासाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटलं आहे. जे भारतीय युक्रेनमध्ये रहाणार आहेत त्यांनी त्यांच्या वास्तव्याबद्द्लची माहिती दुतावासाला कळवावी असेही आवाहन केलं आलं आहे. भारतीय दुतावास हा नेहमीप्रमाणे काम सुरु ठेवणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

युक्रेनचे अध्यक्ष रशियाबाबत निर्धास्त, पण अमेरिकेचे इशारे सुरूच!

याआधीच अमेरिकेसह अनेक देशांनी युक्रेनचा प्रवास टाळण्याच्या सुचना संबंधित देशांच्या नागरीकांना केल्या आहेत. अनेक देशांनी प्रवासी विमान सेवा स्थगित केली आहे तर अनेक देशांनी मार्ग बदलले आहेत. तेव्हा आता साऱ्या जगाचे लक्ष रशिया काय पावले उचलते याकडे लागलं आहे.