रशियाने क्रिमियावर वर्चस्व गाजविण्यास प्रारंभ केल्यापासून तणाव उत्पन्न झाल्यानंतर सुरू असलेल्या आंदोलनात क्यीव्हसमर्थकास गुरुवारी भोसकून ठार मारण्यात आले. अशा आंदोलनाचा हा पहिला बळी ठरला आहे. या वेळच्या आंदोलनात अन्य १६ जण जखमी झाले.
गुरुवारी येथे रशियासमर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी आंदोलकांनी या २२ वर्षीय युवकास ठार मारल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. त्याला भोसकण्यात आले असावे, असा प्राथमिक निष्कर्ष आहे.
दरम्यान, या पेचप्रसंगावर शांततापूर्ण तोडगा निघेल, असा विश्वास वाटत असल्याचे मत युक्रेनचे हंगामी पंतप्रधान आर्सेनी यात्सेन्यूक यांनी व्यक्त केले आहे. या प्रश्नी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत विस्तृत चर्चा केली व त्यांचा पूर्ण पाठिंबाही मिळविला. यात्सेन्यूक यांनी एक निवेदन जारी केले असून सदर निवेदन इंग्रजी व रशियन भाषेतही आहे. क्रिमियात जबरदस्तीने घुसविण्यात आलेल्या लष्करी फौजा मागे घेऊन हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही वास्तवपूर्ण चर्चा सुरू करा, असे आवाहन त्यांनी रशियास केले.
युक्रेनने १९९४मध्ये आपला आण्विक कार्यक्रम सोडून दिला आहे, परंतु हा पेचप्रसंग सोडविण्यात आला नाही तर जागतिक स्तरावरील सुरक्षाही धोक्यात येऊ शकते, असा इशारा यात्सेन्यूक यांनी रशियास दिला. रशियाच्या या चालीमुळे अण्वस्त्र प्रसारबंदी करारही अडचणीत येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
आम्हाला चर्चा हवी, कोणत्याही प्रकारचे लष्करी अतिक्रमण नको आहे, असे यात्सेन्यूक यांनी स्पष्ट केले.