अमेरिका आणि इराणमधील युद्ध नुकतंच संपलं आहे. मात्र, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत. कारण आज (१८ जून) युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर भीषण ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनने केलेल्या या हल्ल्यात रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.
त्यामुळे रशिया पुन्हा युक्रेनला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता असून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, युक्रेनने रशियावर केलेल्या ड्रोन हल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत या हल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
युक्रेनने या आठवड्यात दुसऱ्यांदा मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य केलं आहे. या हल्ल्यानंतर गुरुवारी मॉस्कोमध्ये मोठ्या प्रमाणात काळा धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसून आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रशियाने कीव्हवर केलेल्या हल्ल्यानंतर आज युक्रेनने केलेल्या या हल्ल्यानंतर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर असं म्हटलं आहे.
रशियाने कीव्हवर केलेल्या अलीकडच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून युक्रेनने हा हल्ला केल्याचं स्पष्टीकरण झेलेन्स्की यांनी दिलं. या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाने कीव्हमधील काही ठिकाणांवर हल्ले केले होते, त्यामध्ये किमान ११ जण ठार झाले होते.
रशियावर ड्रोन हल्ला; विमानसेवा स्थगित
रशियाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार विविध क्षेत्रांवरून आलेले किमान ५५५ युक्रेनियन ड्रोन पाडण्यात रोखण्यात आले आहेत, तर मॉस्कोच्या दिशेने येणारे २०० ड्रोन रोखण्यात आले आहेत. तसेच रशियन सरकारने जाहीर केलं आहे की मॉस्कोमधील सर्व विमानतळांवरून होणारी विमानसेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
झेलेन्स्की काय म्हणाले?
“काल रात्री आमच्या लांब पल्ल्याच्या हल्ल्यांनी पुन्हा एकदा मॉस्कोपर्यंत धडक दिली. या आठवड्यात दुसऱ्यांदा मॉस्कोमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आम्ही लक्ष्य केलं. रोस्तोव्ह क्षेत्र आणि युक्रेनमधील तात्पुरत्या स्वरूपात बळकावलेल्या प्रदेशांमधील ठिकाणांवरही हल्ले करण्यात आले. आमच्या शहरांवर आणि वस्त्यांवर रशियाने केलेल्या हल्ल्यांना हे पूर्णपणे समर्थनीय प्रत्युत्तर आहे. तसंच रशियाच्या युद्ध यंत्रणेला बळ पुरवणाऱ्या सुविधांविरुद्ध आमच्या योद्ध्यांनी केलेल्या कामगिरीचा हा आणखी एक महत्त्वाचा परिणाम आहे. मी युक्रेनच्या संरक्षण आणि सुरक्षा दलांचं विशेषतः युक्रेनची सुरक्षा सेवा, मानवरहित प्रणाली दल, विशेष अभियान दल, संरक्षण गुप्तचर विभाग आणि अचूक मारा करणाऱ्या आमच्या क्षेपणास्त्र ब्रिगेडचं त्यांच्या समन्वित प्रयत्नांबद्दल आभार मानतो. अलीकडच्या काळात आमच्या मध्यम पल्ल्याच्या आणि लांब पल्ल्याच्या हल्ल्यांमधील अचूकता व परिणामकता सर्व देशांच्या लक्षात आली असेल. आता हे युद्ध संपवण्याची वेळ आलीय आणि रशियाने मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने आवश्यक पावलं उचलली पाहिजेत”, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
