गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर हवाई हल्ले करत आहेत. या युद्धाचा दोन्ही देशांवर मोठा परिणाम होत आहे. आता रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा भडकलं असून युक्रेनने रविवारी (१६ ऑगस्ट) रशियाची राजधानी मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
युक्रेनने केलेल्या हल्ल्यात किमान सहा जण ठार झाले आहेत. तसेच युक्रेनने मॉस्कोवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर रशियाची सर्वात मोठी कंपनी वाइल्डबेरीजच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीनंतर आकाशात काळ्या धुराचे प्रचंड मोठे लोट उठले आहेत. याचा व्हिडीओही समोर आला आहे. युक्रेनने रशियावर आतापर्यंत केलेल्या हल्ल्यांपेक्षा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जातं.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने काय म्हटलं?
युक्रेनने रविवारी रशियाची राजधानी मॉस्कोवर भीषण ड्रोन हल्ला केल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं की, रशियाने रात्रभर युक्रेनचे ८२२ ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत. दरम्यान, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितलं की, मॉस्को शहराच्या दिशेने जाणारे सुमारे ६०० पेक्षा जास्त ड्रोन आढळले होते. त्यापैकी एक-तृतीयंश ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले आहेत. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.
रशियाच्या तीन शहरांना करण्यात आलं होतं लक्ष्य
युक्रेनने रविवारी रशियाची राजधानी मॉस्कोवर भीषण ड्रोन हल्ले केले. याचवेळी युक्रेनने रशियाच्या तीन शहरांना लक्ष्य केलं होतं. रशियाच्या नैऋत्येकडील रोस्तोव्ह प्रदेशातील तीन शहरांनाही लक्ष्य करण्यात आलं होतं. गव्हर्नर युरी स्लुसार यांनी सांगितलं की, १५० पेक्षा जास्त ड्रोनचा वापर करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात पाच जण ठार झाले आहेत. यामध्ये अनेकांच्या घरांचं आणि एका रेल्वे स्थानकाचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच एका जंगलाला आग लागल्याचंही त्यांनी सांगितलं.
Just wow Moscow 2026 after a massive Ukrainian drone attack on a wildberries depot. pic.twitter.com/AE2MN2wukh
— WarMonitor???? (@WarMonitor3) August 16, 2026
दरम्यान, युक्रेन हल्ला करताना रशियाच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या वाइल्डबेरीज या कंपनीला टार्गेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. जुलैपासून या कंपनीच्या किमान २० गोदामांवर हल्ले करण्यात आले आहेत. आता रात्रीच्या सुमारास ज्या कोलेडिनो वितरण केंद्रावर हल्ला झाला, ते मॉस्को क्षेत्रातील वाइल्डबेरीजच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे.
